कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात मृत्यूचे तांडव; एका दिवसांत जगातील आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद

नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. काही प्रमाणात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी मृत्यूचे प्रमाण कालच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळाले. देशात गेल्या २४ तासांत झालेल्या मृत्यूंची संख्या ही एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. देशातल्या दैनंदिन बाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या २४ तासात ६,१४८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातल्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *