भाजप नेत्याच्या मुलीची हत्या; डोळे बाहेर काढून झाडाला लटकवला मृतदेह
देश बातमी

भाजप नेत्याच्या मुलीची हत्या; डोळे बाहेर काढून झाडाला लटकवला मृतदेह

नवी दिल्ली : भाजपनेत्याच्या मुलीची निर्घण हत्या केल्याची घटना झारखंडच्या पलामू जिल्ह्यात घडली आहे. तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करण्याआधी आणि झाडाला लटकवण्याआधी तिचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. पीडित मुलगी ही स्थानिक भाजपा नेत्याची मुलगी होती. ती दहावीच्या वर्गात होती. तिचे वय १६ वर्ष होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलमधील कॉल डेटा रेकॉर्डच्या (सीडीआर) आधारे २३ वर्षीय प्रदीप कुमार सिंह धुनक याला अटक केली आहे. प्रदीप हा मुख्य संशयित आरोपी असून विवाहित आहे. त्याच्यासोबत इतरही काहीजण सहभागी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी सकाळी १० वाजता घर सोडल्यानंतर मुलगी बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबाने मंगळवारी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांकडून शोध सुरु असताना गावकऱ्यांना जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पीडितेचा मृतदेह आढळून आला.

हत्या करण्याआधी पीडितेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर आत्महत्या दर्शवण्यासाठी हत्या करुन मृतदेह झाडाला लटकवण्यात आला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाने आरोपींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे.