देशात दीड लाखांच्या घरात नवीन रुग्ण; मृत्यूचा आकडाही ८००च्या घरात
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात दीड लाखांच्या घरात नवीन रुग्ण; मृत्यूचा आकडाही ८००च्या घरात

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत कोरोनाचं अक्षरशः थैमान सुरू आहे. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. मागील २४ तासात पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले असून, जवळपास ८०० रुग्णांना जीव गमावावा लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. गर्दी आणि कोरोना नियमाबद्दलची उदासिनता यामुळे दिवसेंदिवस रुग्णासंख्या नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल एक लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ७७ हजार ५६७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. २४ तासांत ७९४ म्हणजेच जवळपास ८०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३२ लाख ५ हजार ९२६ इतकी झाली आहे.