सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, बड्या लष्करी अधिकाऱ्याचं वक्तव्य
देश बातमी

सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, बड्या लष्करी अधिकाऱ्याचं वक्तव्य

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाक व्याप्त काश्मीर संदर्भात मोठं वक्तव्य केलं होत. पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आणलं जाईल, असं ते म्हणाले होते. आता संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पुढचं पाऊल टाकलंय. सरकार जो आदेश देईल त्याचं पालन केलं जाईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उपेंद्र द्विवेदी यांनी आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत. सरकार जसा आदेश देईल तशी कृती आम्ही करु, आदेशाप्रमाणं काम केलं जाईल. उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला देखील इशारा दिला आहे. पाकिस्ताननं शस्त्रबंदीचं उल्लंघन केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल. दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखली पाहिजे. पाकिस्तान जशी पावलं उचलेल तसं त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, असं द्विवेदी म्हणाले.

राजनाथ सिंह गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पाकिस्ताननं काश्मीरवर ताबा मिळवला आहे त्याची किंमत त्यांना चुकवावी लागणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही काश्मीरचा विकास सुरु केला आहे. आम्ही जोपर्यंत गिलगिट आणि बाल्टिस्तान पर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत थांबणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर आता उपेंद्र द्विवेदी यांनी देखील संकेत दिले आहेत. चिनार कॉप्सने देखील याबाबत वक्तव्य केलं होतं. सरकारच्या आदेशाची वाट पाहत असून लगेचच कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

उपेंद्र द्विवेदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलींगवर देखील भाष्य केलं आहे. दहशतवादी गोंधळले आहेत त्यामुळं निष्पाप लोकांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, त्यांचा उद्देश पूर्ण होणार नाही. काश्मीर खोऱ्यात युवकांना शिक्षण देण्याची गरज असून त्यांना दहशतवादाच्या वाटेपासून रोखण्याची गरज आहे, असं उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीर राजकीय मुद्दा

भारताच्या राजकारणात पाकव्याप्त काश्मीर नेहमी राजकारणाचा मुद्दा राहिला आहे. भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश करु असं म्हटलं होतं. राजनाथ सिंह आणि उपेंद्र द्विवेदी यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.