पश्चिम महाराष्ट्र बातमी

उसाच्या शेतात लपवला ५८ लाखांचा गांजा; अन्…

पाथर्डी : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात उसाच्या शेतात लपवलेला ५८ लाख रुपयांचा गांजा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ रुपये असावी. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथे आज, रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यासंदर्भात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. तहसीलदार व वजन मापे निरीक्षकांच्या उपस्थितीत सायंकाळपर्यंत या गांजाची मोजदाद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गांजा ७२१ किलो १४२ ग्रॉम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे ५७ लाख ६९हजार १३६ आहे. एक किलो गांजाची किंमत सरकारी दरानुसार साडेसात हजार रुपये गृहीत धरण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले. सावित्री बापू आव्हाड व सुमन साहेबराव आव्हाड (दोघी रा. शंकरवाडी, पाथर्डी) अशी दोघींची नावे आहेत. जेथे गांजा पकडला तेथील शेतातच या दोघी राहतात.

अशी झाली कारवाई
एका दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना अचानक उसाच्या शेतात दडवलेला गांजाचा प्रचंड मोठा साठा आढळला.नेवासे तालुक्यातील चांदा येथील एका दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास नेवासे पोलीस करत होते. त्यावेळी पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतात गांजा असल्याची माहिती समजली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना दिल्यानंतर त्यांनी या शेतात छापा टाकण्याचे आदेश पाथर्डी व नेवासे पोलिसांना देत ते स्वत: या कारवाईत सहभागी झाले.

आज सकाळी आठच्या सुमारास मुंडे यांच्यासह पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे, सोनईचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, शनिशिंगणापूरचे सहायक निरीक्षक सचिन बागुल, पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी भगवान सानप, देविदास तांदळे, अनिल बडे, पोपट आव्हाड, एकनाथ बुधवंत, महिला पोलीस कर्मचारी प्रतिमा नागरे यांचे पथक शंकरवाडी येथे गेले व त्यांनी तपासणी केली असता उसाच्या शेतात शंभर मीटरावर गांजाचा मोठा ढीग लपवलेले आढळला. हा सर्व गांजा २ ते १० किलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळून आला.