देशात ३ महिन्यांतील निचांकी कोरोनाग्रस्तांची नोंद; लसीकरणाचाही विक्रम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ३ महिन्यांतील निचांकी कोरोनाग्रस्तांची नोंद; लसीकरणाचाही विक्रम

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला होता. मात्र, सध्या देशात दिलासादायक वातावरण तयार झाले असून कोरोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ९१ दिवसानंतर सर्वात कमी कोरोना रुग्ण आढळले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात एकूण ९१ दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या कमी होऊन ५० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासात देशात ४२ हजार ६४० कोरोना रुग्ण आढळले. या कालावधीत एकूण १ हजार १६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पॉझिटीव्ह दर ५ टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. तसेच गेल्या २४ तासात ८१ हजार ८३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात २ कोटी ९९ लाख ७७ हजार ८६१ कोरोना रुग्ण आढळले. तर २ कोटी ८९ लाख २६ हजार ०३८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच ३ लाख ८९ हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६ लाख ६२ हजार ५२१ बाधित रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

लसीकरणाचा विक्रम
देशात मागील २४ तासांत एका दिवसांत आतापर्यंत सर्वाधिक अशा ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. यापूर्वी एकाच दिवशी ४८ लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता, तो आज मागे टाकत दिवसभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरणात आले.