मराठा मूक आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

मराठा मूक आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंची मोठी घोषणा

नाशिक: मराठा मूक आंदोलनासंदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणा दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. खासदार संभाजीराजे यांनी आज सकाळी नाशिकमध्ये मूक आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागेल असे सरकारचे म्हणणे आहे. या मागण्यांची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी होत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील मूक आंदोलनाच्या समन्वयकांनी हे आंदोलन थांबवायचे नाही, असे निर्धार केला आहे. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन तूर्तास १ महिन्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. जर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर मात्र आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

आम्ही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मूल आंदोलन करण्याचे ठरवले होते. त्यानुसार कोल्हापूर आणि नाशिकमध्ये आम्ही मूक आंदोलन केले आहे. मात्र राज्यातील सर्वच ३६ जिल्ह्यांमध्ये जाण्याची आमची इच्छा नाही, असे सांगत आम्हाला समाजाला दिशाहीन करायचे नाही, तर त्याला दिशा द्यायची आहे, असेही संभाजीराजे पुढे म्हणाले.