रेखा जरे हत्याकांड;  फरार पत्रकार बाळ बोठेला अटक
बातमी महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांड; फरार पत्रकार बाळ बोठेला अटक

अहमदनगरमधील यशस्विनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठेला अटक करण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठेला पोलिसांनी हैदराबाद मधून ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथकं बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माहिती होऊन नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या, अशी माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा घाटात रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी भिंगारदिवेसह पाच जणांना अटक केली होती. तर बोठे मात्र फरार झाला होता. फरार होताना त्याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त केलेले आहेत.

तसेच बोठे याच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाच पोलीस पथक रवाना करण्यात आलेली होती. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर मिळून आले होते. बोठेला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर बोठे हैदराबादमध्ये असल्याचं माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी रवाना झाले. यावेळी पोलिसांना गुंगारा देत असताना अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली.