लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक; तलवारी जप्त
देश बातमी

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपीला दिल्लीत अटक; तलवारी जप्त

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. या घटनेप्रकरणी अभिनेता यापूर्वी दीप सिद्धू याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महिंदर सिंग उर्फ मोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मोनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हिंसाचाराच्या घटनेपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. ३० वर्षीय मोनी दिल्लीतीलच स्वरूप नगर येथील रहिवासी असून, त्याला पितम पुरा बस स्थानकाजवळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. दिल्ली पोलिसांच्या व्हिडीओत महिंदर तलवारीसह हिंसाचारात सहभागी असल्याचं दिसत आहे.

मोनीच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी दोन तलवारी सापडल्या. पोलिसांनी तलवारी जप्त केल्या असून, आरोपी महिंदर सिंगची चौकशी पोलिसांकडून केली जात आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात अभिनेता दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना मारहाण करण्याबरोबरच धार्मिक ध्वज फडकावला होता.