तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस
पुणे बातमी

तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस

पुणे : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी रविवारी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. त्यानंतरही हा वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसत नाहीत. याचे कारण म्हणजे वानवडी पोलिसांनी पुजाची चुलत आजी शांताबाई चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना बजावलेली नोटीस.तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई चव्हाण पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात पोहचल्या होत्या. पण वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. असा आरोप शांताबाई चव्हाण यांनी केला आहे, तर पोलिसांनी त्यांनी तक्रार दाखल करुन घेतली असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, माजी मंत्री संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्या विरोधात पूजाचा गर्भपात करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तृप्ती देसाई आणि पूजाची चुलत आजी म्हणून घेणाऱ्या शांताबाई चव्हाण यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अशाप्रकारे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.

त्यांना दिलेल्या नोटिशीमध्ये ‘तुमची तक्रार लिहून घेतली असून त्यावर चौकशी करण्यात येईल असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तरी देखील तुम्ही आताच्या आता गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करत आहात. ही बाब शासकीय कामात अडथळा ठरते. आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करू द्या अन्यथा तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल’ असे म्हटले आहे.

दरम्यान, शांताबाई यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, पूजाच्या मृत्यूला 18 दिवस झालेले आहेत. पूजाच्या मृत्यू प्रकरणात कुणीही नातेवाईक गुन्हा दाखल करायला आलेले नाहीत. म्हणून मी नातेवाईक या नात्यानं आम्ही वानवडी पोलिस ठाण्यात जाणार आहोत. पूजाच्या मृत्यूप्रकरणी कुणीही आरोपी असो मग ते अरुण राठोड, विलास चव्हाण, असो किंवा मंत्री संजय राठोड असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर मी पुण्यातून बाहेर जाणार नाही, असं पूजाची आजी शांताबाई यांनी सांगितलं. व्यवस्थित चौकशी झाली नसेल तर मी पोलिसांविरोधात देखील गुन्हा दाखल करणार आहे, असंही शांताताई राठोड यांनी सांगितलं होतं.

शांताबाई पुढे म्हणाल्या की, संजय राठोड, अरुण राठोड, विजय चव्हाण यांच्यावर गुन्हा करणार आहे. विजय म्हणत होता पोस्टमार्टम होऊ देऊ नका, पोस्टमार्टम रिपोर्ट कुठे गेला, फक्त मृत्यू झाला म्हणून नोंद आहे. कितीही पळवाट काढली तरी काहीही होणार नाही. आता पुढे आले नाहीतर आमच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक नंतर मंत्री संजय राठोड एकच व्यक्ती आहे म्हणून समाज पुढे येत नाही.’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.