अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस-भाजपात जुंपली; इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आक्रमक

मुंबई : राज्यात कोरोना संकटाने डोके पुन्हा वर काढलेले असतानाच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेत्यांकडून केंद्रातील मोदी सरकाविरोधी घोषणा देत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली होती. तर, सभागृहाच्या बाहेर भाजपा नेते राज्य सरकारविरोधात घोषणा देत होते. रॅली विधानभवनाजवळ पोहोचताच काँग्रेस आणि भाजपा आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस आमदार सायकलवरुन विधानभवानाकडे रवाना झाले. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना म्हटलं की, “केंद्रातील मोदी सरकारने ज्या पद्दतीने महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे त्यामधून सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील केलं आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात विरोध होत आहे. परवा पेट्रोलियम मंत्र्यांनी थंडीमुळे भाव वाढल्याचा जावईशोध लावला. या पद्धतीने वारंवार थट्टा करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जो प्रयत्न सुरु आहे, लोकांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचं काम सुरु केलं आहे त्याचा विरोध आम्ही करत आहोत. विरोधक इंधन दरवाढीसंबंधी खोटी माहिती पसरवत आहेत. केंद्राने आपलं विश्लेषण जनतेसमोर मांडावं असं असताना पेट्रोलियम मंत्री थंडीमुळे वाढल्याचं सांगत आहेत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावं. गुजरात किंवा इतर राज्यांप्रमाणे १० रुपयांनी पेट्रोल दर कमी करण्यात आले आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं. अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं दिसतंय. त्यामुळे त्याचं श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. पण राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.