मोठी बातमी : वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

मुंबई : शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले ८२ वर्षांचे लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिके वरील निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय होईपर्यंत राव यांना नानावटी रुग्णालयातच ठेवण्याचे स्पष्ट केले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वैद्यकीय कारणास्तव राव यांची तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी या मागणीसाठी राव यांच्यासह त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. याच याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता राव यांना त्यांच्या हैदराबादमधील घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही.

राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता आम्ही त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत, असं उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे. राव यांच्यावरील गुन्हा गंभीर असून त्यांना विशेष न्यायालयाच्या परिसरातच राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सध्या त्यांना सहा महिन्यांचा जामीन देण्यात आला असून त्यानंतर त्यांनी शरणागती पत्करावी वा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करावा असं न्यायालयाने निकालामध्ये म्हटलं आहे.

राव यांच्यावर नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, सशस्त्र क्रांतीद्वारे सध्याचे सरकार उलथवून लावण्याचा कट अंमलात येण्यासाठी प्रयत्न करण्याचा गंभीर आरोप आहे. शिवाय राव यांचे आजारपण हे वृद्धत्वाशी संबंधित असून त्यांना विशेष काळजीची गरज भासल्यास पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल. नानावटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार राव यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा एनआयएने न्यायलयासमोर केला होता.