साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय
देश बातमी

साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय

अमरोहा : तरुण तरुणीची प्रेमप्रकरण आणि ब्रेकअप सध्या खूप कॉमन झाले आहे. मात्र प्रेमात धोका मिळाला म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. साहेब, प्रेयसीने धोका दिलाय..मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करायला चाललोय, तुमचा फोन होल्डवर ठेवा, ट्रेन येताच मी उडी मारेन, ही वाक्य एका प्रियकराची आहेत. प्रियकराच्या अशा फोनकॉलमुळे पोलीस ठाण्यात चांगलीच खळबळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नक्की काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अमरोहा जिल्ह्यातील नगर कोतवाली परिसरातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाचं शेजारच्या परिसरातील मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होतं. हा युवक मुलीसोबत लग्न करू इच्छित होता. ५०० रुपये, काजू आणि मनुके मुलीला दिल्यानंतर तिने हे खूप कमी आहे असं सांगत ते पैसे आणि काजू प्रियकराच्या अंगावर फेकून दिले. त्यानंतर दुखावलेल्या युवकाने शुक्रवारी रात्री १ वाजता ११२ नंबर डायल करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली.

या फोनमध्ये प्रियकर म्हणाला की, साहेब, प्रेयसीने धोका दिलाय.. मी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी जात आहे, ही माहिती मिळताच पोलिसांनी कंट्रोल रुममधून नगरच्या पोलीस निरीक्षक रविंद्र सिंह यांना माहिती दिली, स्वत: पोलीस अधिकाऱ्याने फोनवरून प्रियकराला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आत्महत्या करण्यावर ठाम राहिला. त्याने अधिकाऱ्याला सांगितले तुम्ही फोन होल्डवर ठेवा, मी ट्रेनसमोर उडी मारत आहे, असं सांगत प्रियकराने फोन ठेवला, त्यानंतर पोलीस अधिकारी आणि ११२ च्या कर्मचाऱ्यांनी चक्र फिरवली, थोड्याच वेळात या युवकाला रेल्वे स्टेशनच्या जवळ सुखरूप पकडण्यात आले.

जेव्हा त्या प्रियकराला पकडलं तेव्हा तो नशेत होता, त्याला स्वत:ला सावरणंही कठीण होतं, त्यानंतर पोलिसांनी या प्रियकराला टीपी नगर पोलीस ठाण्यात नेलं, त्याची समस्या जाणून घेतली. पोलिसांनी या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलीस चौकीला आणलं. येथे त्याने आपली समस्या पोलिसांना सांगितली, प्रेयसीला मी ५० रुपये आणि काजू-मनुके दिले होते, परंतु तिला ते कमी वाटले आणि मला सोडून गेली, पोलिसांनी प्रियकराला आता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं आहे.