चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली
देश बातमी

चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली

मेरठ: सैन्यात नोकरी लागली म्हणून एक तरुण अत्यंत आनंदी होता. त्याने चार महिने सैन्यात जवान म्हणून कामही केलं, चार महिने पगारही घेतला. मात्र, त्यानंतर त्याला असं काही कळालं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चार महिने जवान म्हणून काम केलेल्या तरुणाला कळाले की त्याची कधी सैन्यात भरतीच झाली नव्हती. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहुया.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सैन्यात नोकरीच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक

सैन्यात नोकरीच्या नावाखाली १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यात समोर आली आहे. आरोपींनी तरुणाची आणि त्याच्या भावाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक तर केलीच, शिवाय त्यांना चार महिन्यांसाठी बनावट नोकरीही मिळवून दिली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा एक साथीदार सध्या फरार आहे.

गाझियाबादचा रहिवासी असलेला मनोज कुमार नावाचा तरुण हा मुझफ्फरनगरच्या खतौली पोलीस ठाण्याच्या कंक्राला येथील रहिवासी राहुल सिंगच्या संपर्कात आल्याचं तपासात समोर आले आहे. राहुल मेरठच्या दौराला येथील कृष्णा कॉलनीत राहतो. तो टेरिटोरियल आर्मीमध्ये तैनात आहे.

राहुलने त्याचा दौराला येथील मित्र बिट्टूसोबत मिळून मनोजला सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मनोज आणि त्याच्या भावाला नोकरी मिळवून देण्यासाठी १६ लाखांची रक्कम निश्चित करण्यात आली होती. यानंतर मनोजने दहा लाख रुपये रोख दिले आणि सहा लाखांची रक्कम राहुलच्या बँक खात्यात जमा केली.

टेरिटोरियल आर्मीमध्ये चार महिने नोकरी

यानंतर राहुलने मनोजला टेरिटोरियल आर्मी ऑफिसमध्ये सोबत ठेवण्यास सुरुवात केली. राहुलने मनोजला बाजारातून विकत घेतलेला लष्कराचा गणवेश दिला आणि ओळखपत्रही दिले. त्याने मनोजला त्याच्या कार्यालयात फॉलोअर म्हणून ठेवले. मनोज स्वयंपाक करण्याचं काम करु लागला.

योजनेनुसार, बिट्टू कर्नलचा गणवेश घालून मनोजशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. त्यामुळे त्याच्या मनात शंकाही आली नाही. कर्नल अजूनही परदेशात आहेत, तिथून परतल्यानंतर त्याचा विभाग बदलला जाईल, असे मनोजला सांगण्यात आले. त्यानंतर त्याला अनुयायी म्हणून नोकरी करावे लागणार नाही. मनोजने चार महिने काम केले आहे. त्यांच्या खात्यात दरमहा १२ हजार रुपये पगारही जमा होत होता.

कर्नल पुढे न आल्याने मनोजला राहुलवर संशय आला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली. मनोजच्या तक्रारीवरून मेरठ पोलिसांनी लष्कराच्या दिल्ली युनिटशी संपर्क साधला. यानंतर लष्कराच्या दिल्ली युनिटने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी आरोपी राहुल आणि बिट्टू या दोघांना अटक केली आहे. या दोघांविरुद्ध चौकशी सुरु केली आहे.

एसपी सिटी मेरठ पियुष सिंह यांनी सांगितले की, राहुलने सैन्यात शिपाई असल्याची बतावणी करुन १६ लाख रुपयांची फसवणूक केली. यामध्ये तीन जणांचा सहभाग आढळून आला आहे. राहुल आणि बिट्टूला अटक करण्यात आली आहे, तर राजा नावाचा एक व्यक्ती फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कँट परिसरातील प्रादेशिक लष्कराच्या कार्यालयात काही व्यक्ती बेकायदेशीरपणे काम करत होते आणि त्याची माहिती कोणालाच कशी नाही. या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत मोठा निष्काळजीपणा केला जात असल्याचंही पुढे आलं आहे.