देशात कोरोनाचे थैमान; मृतांचा आकडा तीन लाखांच्या पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचे थैमान; मृतांचा आकडा तीन लाखांच्या पार

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येनं हाहाकार माजवला आहे. अशात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा दुर्दैवी जागतिक विक्रमही भारताच्या नावावर नोंदवला गेला. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून, गेल्या २४ तासांत ४ हजार ४५४ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत दोन लाख २२ हजार ३१५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ इतकी झाली आहे.

देशात दररोज मृत्यू होत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यू नोंदवले जात असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख तीन हजार ७२० इतकी झाली आहे.