आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक होणार?; राष्ट्रवादीसोबतचा ‘तो’ राडा भोवला
राजकारण

आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक होणार?; राष्ट्रवादीसोबतचा ‘तो’ राडा भोवला

सांगली:सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून गेल्या आठवड्यात आटपाडी येथे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी पाटील यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आज झालेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांनी आमदार पडळकर आणि पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता आमदार पडळकर यांना अटक होणार का? याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदारांची पळवापळवी करण्याच्या वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजू जानकर यांनी केला होता. त्या वादातून आमदार पडळकरांनी गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याची फिर्याद आमदार पडळकर यांनी दाखल केली आहे. त्याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यातून पोलिसांनी दोन्ही गटाच्या दहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळावा, यासाठी आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जांवर आज सुनावणी झाली असता जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांनी दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. बचाव पक्षाच्या वतीने अॅड. प्रकाश जाधव यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रियाज जमादार यांनी काम पाहिले.

आमदार पडळकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, आटपाडीतील राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासह तानाजी पाटील आणि राजू जानकर यांच्या चार आलिशान कार जप्त केल्या आहेत. असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.