भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ
राजकारण

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

नवी दिल्ली : भूपेंद्र पटेल यांनी आज (ता. १३) सोमवारी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पटेल हे पाटीदार समाजातून आले आहेत, त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वी राज्यातील या प्रमुख समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भूपेंद्र पटेल राज्यातील सर्व मोठ्या पाटीदार नेत्यांपेक्षा कमी लोकप्रिय असले तरी यांची निवड करण्यामागील एक कारण म्हणजे भाजप राज्यातील बड्या पटेल नेत्यांमध्ये वर्चस्वाची गटबाजी असल्याचेही मानले जाते. याशिवाय, ते माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे आहेत.

५९ वर्षीय पटेल हे सरदारधामच्या विश्वस्तांपैकी एक आहेत. ज्यांनी पाटीदार समाजाचे आंदोलन उभे केले होते. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर, नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांना पाटीदार मतांच्या दुव्याच्या रूपात पाहिले जात आहे. कारण, २०१७च्या निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपाला मोठा त्रास सहन करावा लागला होता. पटेल, ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या विधानसभा निवडणुका लढल्या जातील, त्यांनी २०१० मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिली मोठी निवडणूक लढवली होती. ते नगरसेवक म्हणून पहिल्या कार्यकाळात महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष झाले.