भाजपचा समान नागरी कायद्याचा गजर, गुजरातमध्ये आश्वासन; कर्नाटकचीही चाचपणी
राजकारण

भाजपचा समान नागरी कायद्याचा गजर, गुजरातमध्ये आश्वासन; कर्नाटकचीही चाचपणी

भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याचा गजर केला. गुजरात विधानसभा निवडणुकीतील जाहीरनामा भाजपने शनिवारी प्रसिद्ध केला. यात सत्ता आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे; तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही, ‘आपले सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे,’ असे सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुजरातमधील सत्ताधारी भाजपने शनिवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्ता आल्यास राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल. तसेच, कट्टरपंथीयांविरोधात एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात येईल, आदी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याबाबत राज्य सरकारच्या समितीद्वारे पुढे येणाऱ्या शिफारशींची पूर्तता करून राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा गुजरात सरकारने २९ ऑक्टोबरला केली होती.

दुसरीकडे, ‘समानता यावी यासाठी आमचे सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे,’ असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी येथे सांगितले. संविधानाच्या प्रस्तावनेतही समता व बंधुत्वाचा उल्लेख करण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दीनदयाळ उपाध्याय यांच्या काळापासून समान नागरी कायद्याच्या आवश्यकतेवर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी हा कायदा देशभरात लागू व्हावा असा अनेकांचा प्रयत्न आहे. आमचे सरकारही त्याच्या अंमलबजावणीचा गांभीर्याने विचार करत आहे, असे ते म्हणाले.