शेतकरी आंदोलनाचा दणका; आणखी एका मित्र पक्षाने सोडली भाजपची साथ
राजकारण

शेतकरी आंदोलनाचा दणका; आणखी एका मित्र पक्षाने सोडली भाजपची साथ

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला चांगलाच फटका बसताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून हे आंदोलन थांबावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असताना, शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आणखी एका मित्र पक्षाने एनडीएची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (आरएलपी)ने आज एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तर, कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या अगोदर अकाली दलने देखील भाजपाची साथ सोडली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत सरकरारद्वरे आणल्या गेलेल्या कृषी विरोधी कायद्यांमुळे आज राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी) एनडीए आघाडीतून वेगळं होत असल्याची घोषणा करत आहे. असं राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी(आरएलपी)चे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी जाहीर केले. बेनीवाल यांनी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवला होता. तसेच, या अगोदर घोषणा केल्याप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हनुमान बेनीवाल हे आता जयपूर, जोधपूर, कोटपुतली, अलवर, नागौर, जैसलमेरसह राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन हरियाणा बॉर्डरच्या शाहजहांपूरकडे निघाले आहेत.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता जवळपास महिना झाला आहे. अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्याने, आता हे आंदोलन अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित केले. यावेळी त्यांनी सात राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत कृषी कायद्यांचे समर्थन केले. पंतप्रधानांच्या या भूमिकेला शेतकरी संघटनांनी उत्तर दिले असून केंद्र सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली आहे.