विश्वविक्रम! १२व्या वर्षी अभिमन्यू मिश्रा बनला ग्रँडमास्टर
क्रीडा

विश्वविक्रम! १२व्या वर्षी अभिमन्यू मिश्रा बनला ग्रँडमास्टर

नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिमन्यू मिश्राने बुद्धिबळ पटातील ज्युनिअर ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे. सर्वात कमी वयात बुद्धिबळ पटातील ग्रँडमास्टर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम १२ वर्षे ७ महिने वय असलेल्या रशियाच्या सर्गेई कार्जकिन याच्या नावावर होता. त्याने हा विक्रम २००२ साली प्रस्थापित केला होता. जवळपास २० वर्षांनी न्यू जर्सीत राहणाऱ्या अभिमन्यू मिश्राने हा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढला तेव्हा अभिमन्यूचं वय १२ वर्षे, ४ महिने आणि २५ दिवस इतकं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिमन्यूने हा विक्रम बुडापेस्टमध्ये होणाऱ्या वेजेर्केप्जो जीएम मिक्स स्पर्धेत प्रस्थापित केला आहे. अभिमन्यूने १५ वर्षीय ग्रँडमास्टर लिओन ल्यूक मेंडोंका याला पराभूत करत हा विक्रम प्रस्थापित केला आहे. भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, ही एक चांगली सुरुवात आहे. हा विक्रम जवळपास २० वर्षांनी मोडीत निघाला आहे. एक ना एक दिवस हा विक्रम तुटणारच होता, अशा शुभेच्छा सर्गेई कार्जकिन याने अभिमन्यूला दिल्या.

यापूर्वी अभिमन्यूने भारताच्या आर. प्रज्ञानंदचा विक्रम मोडीत काढला होता. तेव्हा त्याने तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याची किमया साधली होती. हा विक्रम त्याने १० वर्षे ९ महिने आणि २० दिवसांचा असताना प्रस्थापित केला होता. तर प्रज्ञानंदने हा विक्रम १० वर्षे १० महिने आणि १९ दिवसांचा असताना केला होता.