पण इतिहास चुकीचा होता; वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट
क्रीडा

पण इतिहास चुकीचा होता; वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट

मुंबई : संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीनिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. राज्यात तसंच देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी शिवाजीराजांना अभिवादन केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी शिवजयंतीदिनी ट्विट करत राजेंच्या चरणी त्रिवार अभिवादन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर कोरोनाचं सावट असलं तरी शिवभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. राज्यातीलच नव्हे तर देश्भारतील विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. अशाच रीतीने भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच राजेंची महती ट्विटमधून विषद केली आहे.

वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, “इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली स्थळांवरुन येतात. पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोक शक्तिशाली स्थळं बनवतात…” छत्रपती शिवरायांना माझं वंदन… जय माँ भवानी, असा नाराही त्याने आजच्या जयंतीदिनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसंच शिवरायांचा अश्वावर आरुढ झालेला एक फोटो सेहवागने ट्विट केला आहे.

तर दुसरीकडे छत्रपतींचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार आज, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कोरोनाच्या पुन्हा वाढत्या संसर्गावर देखील भाष्य करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.