अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा
कोरोना इम्पॅक्ट

अमरावती यवतमाळमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूसंसर्गाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा खुलासा

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यात २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन यामुळे नागरिकांसह प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. अशातच अमरावती आणि यवतमाळमध्ये सापडलेल्या रुग्णांबाबत कोरोना राज्याच्या आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरवातीला अमरावती आणि यवतमाळमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण आढळल्याची माहिती कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली होती. मात्र नव्या कोरोना स्ट्रेनचे कोणतेही रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

तसेच, पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

तर, आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही. असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अमरावतीमध्ये चार रुग्णामध्ये एक E484k म्हणून स्ट्रेन आला आहे. स्पाईक प्रोटीनचा स्ट्रेन आहे. यू.के. आणि ब्राझीलच्या स्ट्रेनशी तो मिळताजुळता आहे. या स्ट्रेनची प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते किंवा तो अधिक वेगाने पसरतो. अमरावतीमधल्या 4 रुग्णांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.

तसेच, हा नवा स्ट्रेन अधिक वेगात फैलावू शकतो. त्यामुळे येत्या काळात शासनाला मिनी कन्टेन्मेट तसंच मायक्रो कन्टेन्मेट झोन करावे लागतील आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावे लागतील. त्याच अनुषंगाने अकोल्यात रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला रिजनमध्ये या स्ट्रेनचा जास्तीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि यवतमाळमध्ये एक N444 हा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अजूनही आपल्या व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटने याबाबतची सविस्तर माहिती दिलेली नाहीय. पण या स्ट्रेनमधून होणारा कोव्हिड आणि नॉर्मल कोव्हिड यामध्ये जास्त फरक नसेल”, असं डॉ. शशांक जोशी म्हणाले.