न्यूझीलंडने डावाने जिंकली सलग दुसरी कसोटी; विंडीजला व्हाईटवॉश
क्रीडा

न्यूझीलंडने डावाने जिंकली सलग दुसरी कसोटी; विंडीजला व्हाईटवॉश

न्यूझीलंडच्या संघाने कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करत सलग दुसऱ्या कसोटीत डावाने विजय मिळवला आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिजचा डावाने पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत विंडीजला व्हाईटवॉश दिला आहे. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने विंडीजवर १ डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडकडून हेन्री निकोल्सचं शतक आणि कायल जेमिन्सनचा भेदक मारा ही प्रमुख वैशिष्ट्य ठरली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विंडीजचा निर्णय सुरुवातीच्या सत्रात चांगला ठरला. कर्णधार टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, विल यंग आणि रॉस टेलर यांना माघारी धाडण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. परंतू मधल्या फळीत हेन्री निकोल्सने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉटलिंग, मिचेल, आणि वॅगनर यांनीही अखेरच्या फळीत महत्वपूर्ण खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. निकोल्सने २८० चेंडूत २१ चौकार आणि एका षटकारासह १७४ धावा केल्या. वॅगनरने नाबाद ६६ धावांची खेळी करुन त्याला चांगली साथ दिली. अखेरीस न्यूझीलंडचा पहिला डाव ४६० धावांवर संपवण्यात विंडीजला यश आलं. शेनॉन गॅब्रिअल, अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी ३ तर होल्डर आणि चेस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात विंडीजची सुरुवात अतिशय खराब झाली. मधल्या फळीत जर्मिन ब्लॅकवूडचा अपवाद वगळता एकही फलंदाज न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्याचा सामना करु शकला नाही. साऊदी आणि जेमिन्सन यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे सर्व फलंदाज एकामागून एक माघारी परतत असताना ब्लॅकवूडने एक बाजू लावून धरत ६९ धावांची खेळी केली. जेमिन्सन आणि साऊदी यांनी पहिल्या डावात ५-५ बळी घेत विंडीजचा पहिला डाव १३१ धावांवर संपवला.

फॉलोऑन मिळाल्यावर ब्रेथवेट आणि कॅम्पबेल यांनी संघाला आश्वासक सुरुवातही करुन दिली. बोल्टने ब्रेथवेटला माघारी धाडत दुसऱ्या डावात विंडीजला पहिला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे एका क्षणाला विंडीजची अवस्था ५ बाद १३४ अशी झाली. यानंतर मधल्या फळीत कर्णधार जेसन होल्डर आणि जोशुआ डी-सिल्वा यांनी अर्धशतकी खेळी करत काहीकाळ संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्नही फोल ठरले. होल्डरने ६१ तर डी-सिल्वाने ५७ धावांची खेळी केली. विंडीजचा दुसरा डाव ३१७ धावांवर संपवत न्यूझीलंडने १ डाव आणि १२ धावांनी सामन्यात बाजी मारली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून बोल्ट आणि वॅगनर यांनी प्रत्येकी ३ तर साऊदी आणि जेमिन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.