पृथ्वी शॉचे दमदार शतक; मुंबईकडून दिल्लीचा दारूण पराभव
क्रीडा

पृथ्वी शॉचे दमदार शतक; मुंबईकडून दिल्लीचा दारूण पराभव

मुंबई : खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉला भारतीय संघातून वगळण्यात आलं आहे. टीममधून वगळताच पृथ्वीनं फॉर्ममध्ये परत येण्याचे संकेत दिले आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील मुंबईच्या पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वी शॉने शतक झळकावलं आहे. दिल्लीविरुद्ध झालेल्या लढतीत पृथ्वीनं 89 बॉलमध्ये 15 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 105 रन केले. त्याच्या शतकाच्या जोरावर मुंबईनं दिल्लीनं दिलेलं 212 रनचं आव्हान 32व्या ओव्हरमध्ये आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पृथ्वी शॉ दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये पूर्ण रंगात होता. मुंबईनं पहिली विकेट झटपट गमावली. त्यानंतर त्यानं कॅप्टन श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी 82 रनची भागिदारी केली. अय्यर सहा फोर आणि एक सिक्सच्या मदतीनं 39 रन काढून आऊट झाला. अय्यर आऊट होताच पृथ्वीची सूर्यकुमार यादवसोबत जोडी जमली. टीम इंडियात नुकतीच निवड झालेल्या सूर्यकुमारनंही आक्रमक रन केले. पृथ्वी शॉने 83 बॉलमध्ये शतक झळकावलं. तर सूर्यकुमारनं 32 बॉलमध्येच सहा फोर आणि दोन सिक्सच्या मदतीनं अर्धशतक झळकावलं.

सूर्यकुमार 50 रनवर आऊट झाल्यानंतर पृथ्वी शॉने शिवम दुबेच्या मदतीनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईनं विजयानं सुरुवात केली आहे. तर दिल्लीचा पहिल्याच मॅचमध्ये मोठा पराभव झाला आहे.