आशिया कपमध्ये यंदा भारताचा डंका वाजणार, ‘इतके’ सामने जिंकल्यास अंतिम फेरीत धडकणार!
क्रीडा

आशिया कपमध्ये यंदा भारताचा डंका वाजणार, ‘इतके’ सामने जिंकल्यास अंतिम फेरीत धडकणार!

दुबई: सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२२ चे सुपर ४ टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. आज भारतीय सांगघ्चा सुपर ४ मधील पहिलं सामना आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध असून हा सामना जिंकत भारतीय संघ सुपर ४ मधील आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात करेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर करोडो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती असेल. त्याचवेळी बाबर आझम पाकिस्तानी संघाची धुरा सांभाळणार आहे.

३ सामने जिंकल्यास भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित

भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून सुपर ४ मधील आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करू इच्छितो. असं असलं तरी सुपर ४ मध्ये टीम इंडियासाठी तिन्ही सामने खूप महत्त्वाचे असणार आहेत. भारताला आशिया कपच्या अंतिम फेरीत सहज प्रवेश करायचा असेल, तर तिन्ही सामने जिंकावे लागतील. दोन सामने जिंकूनही भारत अंतिम फेरीत पोहोचू शकतो, पण त्यासाठी त्याला उर्वरित निकालांवर किंवा नेट-रन रेटवर अवलंबून राहावे लागेल.
एका उदाहरणाने आपण हे समजून घेऊया. समजा भारताने सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला हरवले, पण श्रीलंकेकडून भारताचा पराभव झाला, दुसरीकडे श्रीलंकेला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला, त्याचप्रमाणे पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला. तर अशा स्थितीत तिन्ही संघांचे गुण समान राहतील, त्यानंतर अंतिम सामना खेळणारे संघ निव्वळ धावसंख्येद्वारे ठरवले जातील.

सुपर ४ मध्ये एकूण सहा सामने

सुपर ४ साठी पात्र ठरलेले चार संघ एकदाच आमनेसामने येतील. सुपर ४ साठी गट सामन्यातील गुण जोडले जाणार नाहीत. सुपर ४ मध्ये एकूण सहा सामने खेळवले जाणार आहेत आणि जो संघ टॉप २ मध्ये स्थान मिळवेल तो अंतिम फेरीत जाईल. सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात शनिवारी (३ सप्टेंबर) श्रीलंकेने अफगाणिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज ४ सप्टेंबरला (रविवार) होणार आहे.

भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आणि अ गटात अव्वल स्थानावर राहून सुपर ४ साठी पात्र ठरले. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा संघ एकाच विजयासह दुसऱ्या स्थानावर राहिला. तर दोन्ही सामने गमावल्यामुळे हाँगकाँगचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

अफगाणिस्तान ब गटात अव्वल स्थानी

ब गटातील अफगाणिस्तानने आपले दोन्ही सामने जिंकले. अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून तर बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव करून अव्वल स्थान पटकावत सुपर ४ साठी पात्रता मिळवली. श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशचा २ गडी राखून पराभव केला आणि दुसरे स्थान मिळवत सुपर ४ मध्ये प्रवेश केला. त्याचवेळी बांगलादेशला दोन्ही सामने गमावल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

आशिया कपच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक:
४ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
६ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध भारत, दुबई
७ सप्टेंबर : पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
८ सप्टेंबर : भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
९ सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुबई
११ सप्टेंबर: अंतिम सामना, दुबई