माकडांना पळवण्यासाठी शेतकरी झाले ‘अस्वल’, ४००० रुपयांत करतायेत शेताची राखण
वायरल झालं जी

माकडांना पळवण्यासाठी शेतकरी झाले ‘अस्वल’, ४००० रुपयांत करतायेत शेताची राखण

शेती करणं काही सोपं काम नाही. जमीन नांगरावी लागते, त्यामध्ये बिया पेराव्या लागतात मग योग्य प्रमाणात पाणी आणि खत द्यावं लागतं. त्यानंतर पिक येतं. बरं, जर जास्त पाऊस पडला किंवा कडक उन पडलं तर पिकांचं नुकसान होतं. त्यातूनही चांगलं पिक काढण्यात यश मिळालं तर माकडांची भिती ही असतेच. यावर उपाय म्हणून शेतामध्ये बुजगावणं उभं करतात. पण हल्लीची माकडं सुद्धा माणसांप्रमाणे स्मार्ट झाले आहेत. ते बुजगावण्याला काही भिक घालत नाहीत. अखेर या माकडांना अद्दल घडवण्यासाठी आता शेतकरी अस्वल झाले आहेत. ऐकूनच चकित झालात ना? तर मग व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा, शेतकरी अस्वल बनून शेतामध्ये फिरतायेत. अन् हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायेत, खरंच हमारा देश बदल रहा है…

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर या ठिकाणची आहे. येथील शेतकऱ्यांना माकडांनी अक्षरश: हैराण केलंय. नजर चुकवून ते शेतात शिरतात आणि नासधुस करतात. या प्रकरणी शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्यांनी काही अपेक्षित मदत केली नाही. अखेर सर्व शेतकऱ्यांनी मिळून या समस्येवर भन्नाट तोडगा काढला. त्यांनी अस्वलाचा अवतार धारण करून शेतामध्ये फेरफटका मारण्यास सुरूवात केली. परिणामी या अस्वलांना पाहून माकडं प्रचंड घाबरू लागली आहेत. अन् आता शेतीचं कमी नुकसान होतंय.

शेतकरी म्हणाले, शेतामध्ये दररोज ४० ते ५० माकडांची टोळी शिरायची अन् खूप नुकसान करायची. या माकडांना रोखण्यासाठी त्यांनी खूप उपाय केले. अगदी बुजगावण्यापासून गोफणगुंडी पर्यंत सर्वकाही करून पाहिलं. पण माकडं काही ऐकेने अखेर सर्व गावकऱ्यांनी मिळून अस्वल होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पैसे जमा करून ४ हजार रुपयांमध्ये अस्वलाचा कॉश्चूम खरेदी केला. अन् आता ते अस्वल बनून आळीपाळीने शेतामध्ये फिरतात आणि आपल्या उस शेतीचं संरक्षण करतात. या शेतकरी अस्वलांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या बुद्धिचं प्रचंड कौतुक करत आहेत.