कॉलेजमध्ये कर्नाटकचा ध्वज फडकवल्याने मराठी विद्यार्थ्यांनी चोपलं? पोलिसांकडून मात्र वेगळाच दावा
बातमी महाराष्ट्र

कॉलेजमध्ये कर्नाटकचा ध्वज फडकवल्याने मराठी विद्यार्थ्यांनी चोपलं? पोलिसांकडून मात्र वेगळाच दावा

बेळगाव : टिळकवाडी येथील कॉलेजात बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता झालेल्या कार्यक्रमात मराठी आणि कन्नड भाषिक विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी गाण्यावर थिरकत होते. त्यावेळी अचानक एका विद्यार्थ्याने लाल पिवळा कन्नड झेंडा खिशातून काढून हातात उंचावत नाचायला सुरुवात केली. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी झेंडा घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॉलेजमधील कार्यक्रमात कन्नड ध्वज घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला मराठी विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आर. पी. डी. कॉर्नर येथे बेळगाव-गोवा मार्गावर टायर जाळून आंदोलन केले. मात्र पोलीस उपायुक्तांनी मारहाण झालेला आणि मारहाण केलेला विद्यार्थी दोघेही कन्नडीग असल्याचे सांगितले आहे.

कन्नड ध्वज घेऊन नाचणाऱ्या मुलाला दुसऱ्या मुलाने मारहाण केली. ही घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केली. दोन्ही विद्यार्थ्यांना पोलीस स्थानकात बोलावून कॉलेजमध्ये भाषा विवाद करू नका अशी ताकीद देखील दिली. ध्वज घेऊन नाचत असताना दुसऱ्या मुलाचा पाय तुडवला म्हणून मारहाण झाली. कॉलेजमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात दोन्ही मुले कन्नड आहेत असे स्पष्टीकरण डीसीपी रवींद्र गडादी यांनी दिलं आहे. ३ डिसेंबर रोजी सीमा प्रश्नाचे महाराष्ट्राचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई बेळगावला मराठी भाषिकांची भेट घेण्यास येत आहेत. या दोन्ही मंत्र्यांना बेळगावला येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड संघटना करत आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केल्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न चांगलाच तापला आहे. महाराष्ट्राचे मंत्री बेळगाव आणि परिसरातील मराठी जनतेला भेटण्यासाठी येत आहे, हे देखील कन्नड संघटनांना खुपत आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेला भाषिक रंग देऊन आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेने केला आहे.

लाल पिवळा कन्नड झेंडा घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण झालेल्या घटनेला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटना करत असून गोगटे कॉलेजच्या गेटवर चढून लाल पिवळा झेंडा लावून वातावरण तापवण्याचा प्रयत्न कन्नड रक्षण वेदीकेच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलं आहे. रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करून करवे कार्यकर्त्यांनी गोगटे कॉलेजकडे आपला मोर्चा वळवला आणि येथे ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. यावेळी लाल पिवळा झेंडा कॉलेजच्या गेटवर आणि कमानीवर कार्यकर्त्यांनी लावला. नंतर पोलिसांनी करवे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून हलवले.

दरम्यान, कन्नड झेंडा घेऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी उत्तर विभागाचे आय जी. पी. सतीश कुमार करणार असल्याचे कर्नाटकचं अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितलं आहे.