…तर पंढरपूरात पुन्हा भारतनाना जन्म घेईल !
ब्लॉग

…तर पंढरपूरात पुन्हा भारतनाना जन्म घेईल !

सध्या पंढरपूर किंवा सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या चर्चांना रंगत आली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे विद्यमान आमदार दिवंगत भारत नाना भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंढरपूर मतदारसंघांमध्ये भारत नाना भालके पहिल्यांदा आमदार झाले तेही बंडखोरी करून. उपरा विरुद्ध स्थानिक अशा वादात दिवंगत भारत नानांना पंढरपूरच्या मतदारांनी भरभरून मतदान केले. माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्याने तात्कालिक उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूर मतदारसंघांमधून निवडणूक लढवत होते. मोहिते पाटील गटाने पंढरपूरमधून जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळेसचे आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे तिकीट कापण्यात आलं. असे सांगण्यात येते की परिचारक यांनी स्वतः मोहिते-पाटील यांना पंढरपूर मधून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. मोहिते-पाटलांच्या दबावाच्या राजकारणापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तात्कालिक नेते झुकले आणि पंढरपूरमधून परिचारकांच्या ऐवजी मोहिते-पाटील निवडणूकीत उभे राहिले.

त्यानंतर पंढरपूरमध्ये बाहेरच्या लोकांनी राज्य करू नये, स्थानिक लोकं इथलं राजकारण ठरवतील अशी गर्जना करत भारत नाना भालके या पैलवानाने शड्डू ठोकला. माजी उपमुख्यमंत्री आणि एक बाहुबली नेता, मातब्बर घराण्याचे वारस असलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात भारत नाना भालके या पैलवानाने दंड थोपटले.

भारत भालके यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यावेळेस पंढरपूरचे महत्त्व कमी करून अकलूजचे महत्त्व वाढवले जाईल आणि पंढरपूर उपेक्षित वंचित राहील असाही प्रचार करण्यात आला. त्याला तसं कारणही होतं. सध्या अकलूज येथे भरणारा घोड्याचा बाजार हा पंढरपूर येथे पूर्वी भरायचा. जागेअभावी तो बाजार अकलूज येथे स्थलांतरीत करण्यात आला. त्यामुळेच पंढरपूरचे महत्त्व कमी करणारे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी जर मोहिते-पाटील पंढरपूर येथून आमदार झाले तर अकलूज येथे हलवण्यात येईल आणि पंढरपूरचे महत्त्व कमी होईल, असा प्रचार नानांच्या समर्थकांकडून जोरदार करण्यात आला. नाना विरुद्ध दादा ही लढत लक्षवेधी ठरली होती.

पंढरपूर तालुक्यातील गावागावात भारतनाना या स्थानिक भुमिपुत्राला लोकांनी मदत केली. निवडणूक अभूतपूर्व होती. पंढरपूरच्या राजकीय पटलावर भारत नाना भालके यांचा तो पर्यंत उदय झाला नव्हता. एक साधा सर्वसामान्य घरातला पैलवान उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हीच गोष्ट खूप मोठी होती. गावागावात. वाड्या-वस्तीवर लोकांनी वर्गणी जमा करुन भारत नानांचा प्रचार केला. आयाबाया रानावनात फक्त नानांचा प्रचार करत होत्या. जणू एखादे युद्ध लढवल्या सारखच लोक या निवडणुकीत सहभागी झाले होते. माध्यमातील भल्याभल्या राजकीय विश्लेषकांनाही या निवडणुकीचा अंदाज लागला नाही.

भारतात नानांच्या या झंझावातापुढे मोहिते-पाटलांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून भारत भालके यांना मदत करण्यात आल्याचा आरोप मोहिते-पाटील गटाचे समर्थक उघडपणे करु लागले. परिचारक गटाने भारत नानाला मदत केल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर पंढरपूर तालुक्याचे राजकारण हे भारत नाना भालके यांच्या भोवतीच फिरतं राहिलं. भालके विरुद्ध परिचारक अशीच प्रत्येक निवडणुकीत विभागणी झाली. त्यानंतर हॅट्ट्रिक साधत भारत नाना पंढरपूरकरांच्या हृदयात विराजमान झाले.

भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघामधून भारत नानांचा वारस कोण होणार याविषयी चुरस लागली आहे. भारत नानाचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी द्यावी असे भारत नानाच्या गटाकडून मागणी करण्यात येते. दिवंगत औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी भारत भालके यांच्या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. तशा बातम्याही काही माध्यमांमधून पुढे येत आहेत. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पार्थ पवारांची या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का नाही हे माहीत नाही. मात्र पार्थ पवार निवडणूक लढवणार याच्या चर्चा जोर धरत आहेत.

काळाचा महिमा बघा. स्थानिक विरुद्ध उपरा अशा वादात भारत नाना भालके या धुरंदर माणसाचा राजकीय पटलावर उदय झाला. त्याच माणसाच्या निधनानंतर ऊपऱ्या व्यक्तीला उमेदवारी द्या अशी मागणी करावी लागते. या मागणी करणाऱ्यांच्या मनात नेमकं काय आहे, माहित नाही. मात्र जर उपऱ्या माणसाने पंढरपूर मतदारसंघांमधून पुन्हा निवडणूक लढवली तर नक्कीच एक नवा भारत नाना पुन्हा जन्म घेईल !

लेखक – ब्रम्हा चट्टे-पाटील
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.