हैदराबाद संस्थानात ही वृत्तपत्रे होत प्रसिद्ध
ब्लॉग

हैदराबाद संस्थानात ही वृत्तपत्रे होत प्रसिद्ध

आज 6 जानेवारी महाराष्ट्रात दर्पण दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राला सुरुवात केली होती. गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी वृत्तपत्रांचे मोठे योगदान आहे. हैदराबाद संस्थानात सुद्धा क्रांती घडवण्याचे काम अनेक वृत्तपत्रांनी केले आहे. अत्यंत दडपशाही आणि संपादकाच्या जीवाला धोका असतानाही अनेक मराठी मासिक, साप्ताहिक, पत्रे, वृत्तपत्रे त्याकाळी प्रकाशित होत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हैदराबाद संस्थानात मुद्रण स्वातंत्र्य मुळीच नव्हते. विशेष म्हणजे ब्रिटिश सरकारने सुरु केलेल्या वजनदार आणि भारदस्त वृत्तपत्रांनाही बंदी करण्यात आली होती. निझाम सरकारच्या अरेरावी धोरणांमुळे हैदराबाद संस्थानात वृत्तपत्रे फारशी निघू शकत नव्हती, जरी निघाली तरी ती जास्त काळ जगू शकत नव्हती. १९३४ साली हैदराबाद संस्थानात सर्व सरकारी आणि खासगी छापखान्यांची संख्या अवघी १०५ होती. ह्यापैकी बहुतेक छापखाने शिळाप्रेसवर उर्दू कामाकरिता होते. तसेच नवीन वृत्तपत्र, मासिक अथवा छापखाना काढायचा असल्यास त्याला (एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल) सरकारची परवानगी काढावी लागत होती. एखाद्याने परवानगी मागितल्यास त्याच्या संबंधाने पोलिसांकडून अभिप्राय मागविण्यात येत होता. (आजही वृत्तपत्र काढण्यास आपल्याला ह्या प्रोसेस मधून जावे लागते) पोलिसांचा अभिप्राय प्रतिकूल असल्याशिवाय परवानगी मिळू शकत नव्हती.

निझाम सरकारच्या काळात हैदराबाद संस्थानात अनेक इंग्रजी, उर्दू आणि मराठी पत्रे/वृत्तपत्र/मासिके प्रकाशित होत होती. त्यातील काही पत्रे/वृत्तपत्र/मासिके कोण चालवत होती याची कुठेही नोंद नाही. हैदराबादमध्ये वृत्तपत्रास बंदी केल्यास पुणे किंवा मुंबईहून ती छपाई करून मराठवाड्यात वाटली जात असे. खाली काही सुरुवातीचे इंग्रजी, उर्दू आणि मराठी पत्रे/वृत्तपत्र/मासिके देत आहे. (१९२७ साली नोंद करून ठेवण्यात आलेले)

इंग्रजी पत्रे/वृत्तपत्र
१) डेक्कन टाइम्स – १८६४ (सिकंदराबाद येथून सुरु)
२) हैदराबाद टेलिग्राफ १८८२
३) हैदराबाद रेकॉर्ड – १८८५
४) डेक्कन स्टॅंडर्ड – १८८६
५) डेक्कन बजेट – १८९१
६) डेक्कन मेल – १८९६
७) हैदराबाद क्रॉनिकल – १८१७
८) डेक्कन टाईम्स – १९०२
९) डेक्कन पोस्ट – १९०३
१०) बुलेटिन – १९०४
११) डेक्कन हेरल्ड – १९०६
१२) डेक्कन गॅझेट -१९०७

मराठी पत्रे/वृत्तपत्र
१) निझाम वैभव – १८९७ विष्णुपंत खेडकर (फक्त तीन महिने चालले)
२) भाग्येश नगर – १९०४ नर्सो मुकुंदराव
३) हैदराबाद समाचार – १९०४ (कोणी काढले आणि कधी बंद झाले याची नोंद नाही)
४) भाग्यनगर – १९०४ (कोणी काढले आणि कधी बंद झाले याची नोंद नाही)
५) श्री भाग्येश विजय – १९०६ रामचंद्र कुळकर्णी
६) चंपावती -१९०८ (जिल्हा बीड येथून सुरु)
७) गुलबर्गा समाचार – १९०८ (मराठी आणि उर्दू)
८) नागरिक – १९१७ (नांदेड येथून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र)
9) निझाम विजय – १९२० एल. बी. फाटक (मराठी साप्ताहिक)
(त्याकाळी मराठीमध्ये अनेक मासिक, साप्ताहिक,वृत्तपत्र प्रसिद्ध होत होते. इथे फक्त निझामकालीन पुस्तकात असलेल्या नोंदी देत आहे.)

उर्दू पत्रे/वृत्तपत्र
१) षीफक (फारशी) – १८७८
२) शौकतूल इसलाम – १९००
३) ह. दास्तान – १९०१
४) अखबारे आसफी – १९०१
५) अफसरूल अखबार – १९०४
६) सफीरे दकन – १९०५
७) सय्यदुल अखबार (फारसी) – १९०६
८) महबुबूल कुलूच – १९०७
९) मुल्कद मिल्लत – १९१३
१०) नजारे आलम – १९१४

लेखक – जयपाल गायकवाड
लेखक ऐतिहासिक विषयांचे अभ्यासक आहेत.