महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?
ब्लॉग

महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी समृद्धी महामार्ग खरोखर गेमचेंजर ठरणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा, विदर्भ जोडण्याच्या दृष्टीने समृद्धी महामार्गाची संकल्पना आणली होती. या प्रकल्पासाठी सुरुवातीला येथील स्थानिकांनी, शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला होता. आंदोलन करण्यात आली. अखेर यासाठीचा मार्ग मोकळा झाला आणि लांबच-लांब एक्सप्रेसवे सुरू होत आहे. या संपूर्ण महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आहे. हा महामार्ग अनेक दृष्टीने फायद्याचा तसंच महत्वाचा ठरणार आहे. यामुळे मुंबई – नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्यास मराठवाडा-विदर्भच्या विकासालाही चालना मिळणार आहे. वाहतूक, व्यापार, उद्योगासह इथे रोजगाराच्याही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील अशीही माहिती आहे. व्यापाऱ्याच्या दृष्टीने जड वाहतूक जलद गतीने होण्यास या महामार्गामुळे मदत होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा विदर्भाला होईल. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाड्यातून भाजीपाला, फळं, इतर काही वस्तू जलद वाहतुकीच्या मदतीने मुंबईत पोहोचवणं सोपं होईल. सध्या महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा या भागातून मुंबईत भाजीपाला, फळं अशा गोष्टी मुंबई – विदर्भ – मराठवाड्यातील अंतरामुळे योग्य वेळेत पोहोचवणं शक्य होत नाही. त्यामुळे या महामार्गाचा व्यापाऱ्याच्या दृष्टीने मोठा फायदा होईल.

घोषणा ते पूर्तता

नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करणार, अशी घोषणा केली होती. दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे. या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण झाली असून, 114 कामे प्रगतीपथावर आहेत.

अर्थव्यवस्था वाढण्यास मदत

या महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधून औरंगाबादला पोहोचण्याचं अंतरही कमी होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे या मुंबई-नागपूरहून औरंगाबादला जाण्यास ४ तासांचा कालावधी लागेल. या महामार्गाचं प्रमुख मध्यवर्ती ठिकाण औरंगाबाद असणार आहे. त्यामुळे औरंगाबादचं औद्योगिक महत्त्व वाढेल आणि जलद वाहतुकीचा मोठा फायदा होईल. या मार्गावर १९ कृषी समृद्धी केंद्रही उभारली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी ग्राहकांशी जोडले जातील आणि कृषी आधारित अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होऊ शकते.

वेगवान वाहतुकीचा फायदा

कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येतील, त्यामुळे कृषी आधारित संधी उपलब्ध होतील. इथे औद्योगिक केंद्र उभारली जाऊन आर्थिक विकास होण्यास मदत होईल. औद्योगिक विसाकासाठी मनुष्यबळ याच महामार्गातील परिसरातून उपलब्ध व्हावं यासाठी स्थानिकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे केवळ औद्योगिकच नाही, तर इथे निवासी आणि व्यावसायिक विकासही होईल. मालवाहतुकीला सर्वाधिक फायदा होईल. या मार्गावरुन जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटीपर्यंत शेतमाल पोहोचवणं सहज शक्य होईल. आधी प्रवासाचं अंतर जास्त होतं. आता ते अंतर कमी होऊन वाहतूक वेगवान होईल.

भारतातील पहिला हाय स्पीड हायवे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या महामार्गाचं नाव आहे. नागपूर ते शिर्डी हा ५२० किमोमीटरचा टप्पा लवकरच सुरू होईल. या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाची आखणी केली आहे. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल. हा एक्सप्रेसवे भारतातील पहिला हाय स्पीड हायवे आहे.

ग्रीनफिल्ड समृद्धी महामार्ग

नागपूर – मुंबईला जोडणारा हा सर्वाधिक लांबीचा ग्रीनफिल्ड समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरू शकतो. हा महामार्ग नागपुरातील शिवमडका गावापासून ठाणे जिल्ह्यातील आमने गावाला जोडला जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असणार आहे. या मार्गावर प्रत्येकी ५ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनाशुल्क दूरध्वनी सेवेची सुविधा मिळणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळेच अनेक दृष्टीने रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध होतील. तसंच महामार्गात हॉटेल्स, मॉल, दवाखानेही उभारण्यात येणार असल्याची माहिती आहे.