सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले
ब्लॉग

सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले

आज देशात काही भाग वगळता ग्रामीण आणि शहरी भागातही अस्पृश्यता नाहीशी झाली आहे. मात्र आजही काही भागात अप्रत्यक्षपणे का असेना ती पाळली जाते. सवर्ण आणि शुद्र असा भेदभाव आजही केला जातोच. मात्र स्पृश्य आणि अस्पृश्यता, जातीवादाविरोधात संघर्ष हा खुप आधीच सुरु झाला. आणि तो सुरु केला तो क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सावित्रीबाईंनी जोतिबांना तीन पत्रं लिहिली होती. यातील पहिलं पत्रं 1856 चं आहे, दुसरं 1868 चं आहे तर तिसरं पत्रं 1877 चं आहे. ही तिन्ही पत्रं सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. त्यातील एक पत्र आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करत आहोत. घराबाहेर पडून सार्वजनिक कार्य करणारी आद्य सामाजिक कार्यकर्ती जशी या पत्रांमधून आपल्याला भेटते तसंच काळाच्या पल्याड पाहणारी, तिची मानवी हक्कांची भाषा उमगलेली एक संवेदनशील वैचारिकताही समोर येते. खरतर, सावित्रीबाईंची ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षिक एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, हीच त्यांची खरी ओळख आहे, हेच या पत्रांमधील सावित्रीदर्शनानं स्पष्ट होतं.

या पत्रातून त्या आपल्या भावाचे मतपरिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सावित्रीबाई नायगावला आपल्या माहेरी असताना 1856 मध्ये लिहिलेलं पहिलं पत्रं जोतीबाना लिहिले आहे. आहेत. तिथे सावित्री-जोतिबा शूद्र-अतिशूद्रांसाठी काम करतात म्हणून सावित्रीबाईंचा लहान भाऊ त्यांना दोष देत त्यांचे कार्य कुळाला बट्टा लावणारे आहे, असे म्हणतो.
याविषयी त्या पत्रात लिहितात

सत्यरुप जोतिबास्वामी यास,

सावित्रीचा शिरसाष्टांग नमस्कार,

पत्रास कारण की, भाऊ म्हणाला, तू व तुझा नवरा वाळीत असून तुम्ही उभयता महारमांगादी अंत्यजाकरता जी कर्मे करता , ती पतित असून आपल्या कुलास बट्टा लावणाऱ्या आहेत. यास्तव सांगतो की, तुम्ही नवरा बायकोने जातीरूढीस अनुसरून व भट सांगेल त्याप्रमाणेच आचरण करावे. त्यांचे बेलगाम व असंमजस बोलणे ऐकून आई खटकन उतरून काळवंडली. भाऊ तसा दयाळू पण कोत्या बुद्धीचा असल्यामुळे त्यानी तुम्हास व मला दूषणे देऊन आपली निंदा करण्यास कमी केले नाही. आईस वाटले, ती त्यास रागे न भरता ऐकवणी करती झाली की, तुला देवाने रसवंतीसारखी काया दिली असता तिचा असा दुरुपयोग करावा हे चांगले नाही. आईचे बोलणे ऐकून भाऊ उगा राहिला व लज्जा पावून मुकाट्याने बसून राहिला. मी त्याच्या मताचे खंडन करून बोलले. भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणीने दुर्बल झाली आहे. तू शेळी, गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस, नागपंचमीस विषारी नाग पकडून त्यास दूध पाजतोस. महार मांग हे तुझ्या सम मानव असतात. त्यास अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग? असा त्यास प्रश्न केला. भट लोक सोवळ्यात असता तुझा विटाळ मानतात. तुला महारच समजतात. माझे बोलणे ऐकून तो लज्जित झाला व पुसू लागला , महारमांगांना तुम्ही कशासाठी शिकवता ? याविषयी लोक तुम्हाला अपशब्द देऊन त्रास देतात. हे मला ऐकवत नाही.

मी त्यास इंग्रज लोक महारमांगासाठी काय काय करतात ते सांगून विद्याहीनता ही पशुत्वाची खूण आहे . भट लोकांच्या श्रेष्ठत्वास आधारभूत विद्या हीच होय. तिचा महिमा मोठा आहे. जो कोणी तिला प्राप्त करून घेईल त्याची नीचता दूर पळून उच्चता त्याचा अंगीकार करील. माझे स्वामी देवमाणूस आहे. त्याची सर या देशी कोणाला येणार नाही. महारमांगांनी शिकावे व माणूस म्हणून जगावे या कारणास्तव भटगुळांशी झगडत खटाटोप करणारे जोतिबा स्वामी महारमांगांना शिकवितात व मीही त्यास शिकविते. पण त्यात अनुचित काय आहे ? आम्ही उभयता मुलींना शिकवितो, बायांना शिकवितो, महारमांगांना शिकवितो, हेच ब्राह्मणांना अपायकारक होणार, या समजुतीच्या कारणास्तव ते आमच्या माणूस धर्माच्या कामास अब्रह्मण्यम् अब्रह्मण्यम् करीत निंदा कुटाळक्या करतात व तुझ्या सारख्याच्या मनात किल्मीष पेरतात. तुला स्मरत असेल की, माझ्या नवऱ्याचा गुणग्राही इंग्रज सरकारने एक समारंभ घडवून त्यात त्यांच्या कार्याचा गौरव करून, आदरसत्कार घडवून दुर्मती दुर्जनास लाजविले. तुला मी खात्रीपूर्वक बोलते, माझा. नवरा तुझ्यासारखा वारकऱ्याप्रमाणे नुसते हरिनाम घेत वाऱ्या करीत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करीत आहे. त्यास मी मदत करते. हे काम इतके आल्हादकारक होते की, त्यायोगे मला परमानंद होतोच होतो. याव्यतिरिक्त मनुष्याची सीमा दृग्गोचर होते. माझे बोलणे, भाऊ व आई एकाग्र चित्ताने ऐकत राहिली होती. भाऊ पश्चात्ताप पाऊन याचना करता झाला. आई बोलली, सावित्री तुझ्या जिव्हेत सरस्वती नांदत असावी. तुझे ज्ञान ऐकून मी कृतार्थ झालो. दोघांच्या उद्गाराने मात्र माझे अंत : करण समाधानाने भरून आले. यावरून तुमच्या ध्यानात येईल की पुण्यात “आपल्या विषयी” दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत . तसेच येथेही आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे ? सदासर्वदा कामात गुंतावे. भविष्यातले यश आपलेच आहे. अधिक उणे काय लिहावे ही विज्ञापना .
आपली सावित्री