वाढदिवस विशेष : …म्हणून पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत!
ब्लॉग

वाढदिवस विशेष : …म्हणून पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत!

पवारांवर खूप काही लिहिलं गेलंय. भविष्यातही लिहिलं जाईल. बरं वाईट. पटणारं न पटणारं. खरं खोटं. सगळंच. पण इतकं लिहून झाल्यावर एकाही लेखकाने कधी असं म्हटलं नाही की बास, झालं. मी सांगितलं हे इतकेच पवार. यापलीकडे ते नाहीत. त्याचं कारण, पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत!

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सार्वजनिक आयुष्यातली सतत साठ वर्षं तर्क, वास्तव, शक्यता आणि कल्पनांच्या तमाम सीमारेषांवर आपली कारकीर्द अत्यंत यशस्वीपणे तोलून उभा राहिलेला दुसरा कोणताही राजकारणी वर्तमानात नाही. शरद पवारांचं हेच अजोडपण आहे.

आज त्यांना ऐंशी वर्षं होतायत. ज्या कुणाला पवारांच्या दिनचर्येबद्दल किमान अंदाज आहे तो पवारांना ऐंशी पूर्ण होतायत यावर विश्वास ठेवणार नाही. आजही रोज सकाळी सात वाजता पवार लोकांना भेटायला सुरुवात करतात. मग ते दिल्लीत असोत की मुंबईत की पुण्यात की बारामतीत की आणखी कुठे दौ-यावर. त्याआधी त्यांनी सगळे स्थानिक महत्त्वाचे पेपर्स डोळ्यांखालून घातलेले असतात. किमान दोन फोन लावलेले असतात. या वेळेत तुम्ही कोणीही त्यांना भेटायला जा. तुम्ही काहीही सांगा. ते ऐकतात. शांतपणे त्यावर त्यांना जे बोलायचं ते बोलतात. हा जो असा दिवस सुरू होतो तो संपतो कधी याला ताळतंत्र नाही. माणसांचा राबता राहतो. फोन आणि फाईल्स येत जात राहतात. पवार एकेक काम उरकत राहतात. एकेक माणूस सांभाळत पुढे जात राहतात.

जमलंच कधी तर त्यांच्या पीएना सांगा की साहेबांचा मागच्या एका महिन्यातला दौरा आणि गाठीभेटी यांची माहिती द्या. मग अंदाज येईल की ते किती किती दिशांना पसरलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते ते राजकारणी, लेखक ते खेळाडू, शास्त्रज्ञ ते कलाकार, उद्योजक ते अधिकारी – पवार कुणाकुणाला म्हणून भेटत असतात, त्यांची कामं करून देत असतात याची गणती ठेवणं शक्य नाही. त्यांच्या तमाम भेटीगाठी, त्या भेटींचे विषय आणि माणसे जरी बघितली तरी शरद पवार नावाचा हा माणूस आहे की यंत्र असा प्रश्न पडेल. घड्याळ त्यांच्या पक्षाची नाही तर त्यांची स्वतःची निशाणी आहे. पवार घड्याळाची मानवी प्रतिमा आहेत. निरंतर! अव्याहत! अथक! आणि निर्मम!!

ऐंशीव्या वर्षी पवारांचा पसारा हा एखाद्या डेरेदार पिंपळासारखा आहे! किती प्रकारचे पक्षी त्यावर येऊन आपली घरटी बांधतात, पथिक पारावर विसावतात, जनावरं सावलीला बसतात आणि त्या सगळ्यांना आसरा देणं हे जणू आपलं कर्तव्यच आहे अश्या भावनेने पिंपळ पाय रोवून उभा राहतो!! हे पाय असेच घट्ट राहोत. या मातीत खोलवर गेलेली पवार नावाची मुळं इतकीच मजबूत राहोत. ऐंशीव्या वर्षी त्याचं देखणं भव्यपण अधिक खुलून दिसतंय! ते इतकंच भारदस्त राहो!!!

लेखक – अमेय तिरोडकर
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत