मीम म्हणजे आधुनिक लोकसाहित्य?
ब्लॉग

मीम म्हणजे आधुनिक लोकसाहित्य?

रिचर्ड डॉकिन्स यांनी सर्वप्रथम मीम ही संकल्पना मांडली. मीमबद्दल त्यांचे आणि इतर लोकांचे बरेच सिद्धांत आहेत. मीमचे स्वरूप आणि उपयुक्तता वगैरेंवर बरेच वाद-प्रतिवाद आहेत. पण तो सध्या आपला विषय नाही. 2014 पासून भारतीय सोशल मिडियात क्रांती झाली. जनसामान्यांपर्यंत बरीचशी माहिती पोहोचू लागली. ती माहिती, तो मजकूर किती खराखोटा हा आजच्या पोस्ट ट्रूथच्या काळात एक वेगळा विषय होईल. पण काही का असेना, लोकांना अपील होईल अशा गोष्टी त्यांच्यापर्यंत येऊ लागल्या. या सगळ्या बदलामागे फक्त एक गोष्ट होती. ती म्हणजे मीम (meme).

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फोटो आणि सोबत एकदोन ओळी अशा स्वरूपातल्या बेसिक मीम्समुळे प्रचंड बदल घडत गेला. त्यात विनोदी मीम्सचं प्रमाण अधिक होतं. अर्थात त्याचा राजकीय वापर करण्यात आला. आधी फक्त एकाच पक्षाने केला. आता हा वापर सगळेच करतात…सर्रास करतात. त्यात वावगंही काही वाटू नये. डॉकिन्ससाहेब आधीच बोलून गेलेत की मीम ही संकल्पना self evolutionary आहे. त्यामुळे काळानुसार हे मीम वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या contextमध्ये येत जाणार.

भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती यांच्या निगडीत स्पेसिफिक मीम्स जसे आहेत तसेच या सगळ्यांच्या पार जाऊन लोकांच्या मनाला खोलवर भिडण्याची क्षमता ठेवणारे मीम्सही आहेत. आजघडीला फेसबूक, इंस्टावरचेच मीम पेजेस पाहिले तर अक्षरशः शेकडो पेजेस आणि लाखो मीम्स सापडतील. मागे मी लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना त्याची काही वैशिष्टये वाचत होतो. तेव्हा मला अचानक क्लिक झालं की अरेच्च्या, या सगळ्या गोष्टी मीम्सला सुद्धा लागू होतातच की !!

लोकसाहित्य म्हणजे नेमकं काय?
तर लोकांनी तयार केलेलं साहित्य. ते बहुतांश वेळा लिखित नसतं. आपल्या कथा, कविता, कादंबरीपेक्षा ते वेगळं असतं. तमाशा, गवळण, भारूड, कीर्तन, ओव्या, विविध प्रकारची लोकगीतं, विविध दंतकथा, लोककथा, इसापनीती, जातक कथा, भुलाबाईची गाणी, आदिवासी गीतं, दशावतार, म्हणी इत्यादी इत्यादी भरगच्च ऐवज या लोकसाहित्यात येतो. मग मला मीम आणि लोकसाहित्य यांच्यात नेमकं काय साम्य आढळलं? तर दोन्हींची काही कॉमन वैशिष्टये बघू.

1. दोन्ही बाबतीत त्यांचा निर्माता कोण असतो हे माहित नसतं. माहित जरी असलं तरी काही पिढ्यांनंतर त्या निर्मात्याच्या नावाची गरजही उरत नाही. ते साहित्य लोकांचं होऊन जातं. व्यक्तीकडून समाजाकडे ते पास होतं.

2. ते लोकांना सोप्या, समजेल आणि बोलीभाषेत असतात. त्यात फार काही जड गोष्टी नसतात. जड मीमही फार काळ टिकत नाहीत. जास्त लोकांपर्यंत पोचलेले मीम्स खूप जास्त सोपे आणि पटकन भिडणारे असतात.

3. या दोन्हीही गोष्टी समाजाला खाटकन अपील होतात. समकालीन परिस्थितीवर भाष्य असो, कोणावर केलेली टीका असो, हे सगळं समजावून सांगावं लागत नाही. ते समाजाच्या मोठ्या स्तराला आपसूकच समजत जातं.

4. यातली भाषा फार प्रमाण वगैरे नसते. समकालीन slang त्यात येतोच. सो कॉल्ड सभ्य समाज ज्या शब्दांचा वापर करत नाही ते शब्द आपण लोकसाहित्य आणि मीम्स मध्ये भरपूर बघतो. त्यात काही वावगंही नाहीये. सगळं कूल आहे.

5. जातीय, धार्मिक, राजकीय संदर्भ येत जाणं, हेही दोघांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यावरून वादही होतात. पण ते एक वैशिष्ट्य आहेच हे आपण नाकारू शकत नाही.

6. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टी भन्नाट विनोदी असतात. subtle विनोद असेल किंवा पोट धरून हसायला लावणारा विनोद असेल…रूढार्थाने अश्लील विनोद असेल किंवा साधा, सभ्य विनोद असेल..शाब्दिक किंवा मार्मिक अशा सगळ्या प्रकारच्या विनोदाची अफाट रेंज आपल्याला दोन्हींमध्ये दिसून येते. त्यामुळेच लोकांना दोन्ही गोष्टी आवडतात. त्यामुळे मला तरी वाटतं की मीम्स हे आधुनिक लोकसाहित्यच आहे. target audience कदाचित जरा वेगळा असेल, अशिक्षीत जनतेला तेवढा रिलेट होत नसेलही पण या मर्यादा गृहित धरूनही मला असं काहीतरी मांडावसं वाटलेलंय.

आपण आत्ता जुन्या लोकसाहित्याचा अभ्यास करून तत्कालीन समाज, संस्कृतीचा अंदाज बांधतो. तसंच कधी भविष्यात उत्खनन करून जर मीम्स सापडले तर आपल्या सगळ्या संस्कृतीचा अंदाज बांधता येईलच की !!

लेखक – विशाल राठोड