महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
राजकारण

महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही: गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : “महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही” अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयच्या बाबतीत तर आम्ही आता निर्णय घेतलाय की आमच्या परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही व्यक्तीची चौकशी करता येणार नाही. मात्र, ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही” , असं अनिल देशमुख म्हणाले.

तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनीही या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. ”राज्यातील नेत्यांना येणाऱ्या ईडीच्या नोटिसांमध्ये राजकारण आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, महाविकास आघाडी अशा कुठल्याही दबावाला घाबरत नाही. ही आघाडी भक्कम आहे. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.

तर ”ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भाजपचे लोकच माहिती देताहेत. कालपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल.”

”राजकीय सूडभावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांकडे पोहोचवली जाते. त्यामुळे नेत्यांची उगाच बदनामी करायची हा हेतून आह की काय अशी शंका येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान, याआधी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. खुद्द खडसेंनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं असून बुधवारी ते चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर थेट आरोप करत असून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका केली आहे.