द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता
मनोरंजन

द डर्टी पिक्चरच्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता

कोलकाता : द डर्टी पिक्चर आणि लव्ह सेक्स धोका या चित्रपटात भूमिका साकारलेली बंगाली अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी ऊर्फ आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झाला. कोलकातामधील जोधपूर पार्क इथल्या तिच्या निवासस्थानी देवदत्त मृतावस्थेत आढळली. अनेकदा दार ठोठावूनही आतून काही उत्तर न आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलावलं. बऱ्याच वेळापासून घरात बंद असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नाकावर रक्ताचे काही डाग होते. पण त्याव्यतिरिक्त शरीरावर कुठलीही दुखापत झाली नव्हती. देवदत्तला एसएसकेएम रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. देवदत्तचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. ती मदत मागण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करत असताना जमिनीवर पडली आणि तिच्या नाकातून रक्त आले असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी देवदत्तचे दोन मोबाइल फोनसुद्धा तपासासाठी जप्त केले आहेत.

देवदत्त ही प्रसिद्ध सितारवादक दिवंगत पंडित निखिल बॅनर्जी यांची कन्या होती. कोलकातामध्ये जन्मलेल्या देवदत्तने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतामध्ये तिने पदव्युत्तर पदवी घेतली होती. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी यांच्या लव्ह सेक्स और धोखा या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०११ मध्ये तिने द डर्टी पिक्चरमध्येही काम केलं होतं.