आयुष्मानचा येतोय ‘अनेक’; रिलीज डेटची घोषणा
मनोरंजन

आयुष्मानचा येतोय ‘अनेक’; रिलीज डेटची घोषणा

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुराना हा दोन नवीन चित्रपटांसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सोशल मिडियावरून त्यानं ही घोषणा केली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत आर्टिकल १५ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला चित्रपट केल्यानंतर ही जोडी आता पुन्हा अनेक या चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट आयुष्मानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१७ सप्टेंबर २०२१ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो आयुष्मान आपल्या इन्स्टाग्राम पेजवर टाकत असतो. यातली आयुष्मानची भूमिका कशी असेल, त्याच्या सोबत इतर कोणते कलाकार असतील याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी आयुष्मानने या चित्रपटातला आपला लूकही शेअर केला होता.

चंदीगढ करे आशिकी या चित्रपटातही तो दिसणार आहे. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला असून यात आयुष्मानसोबत अभिनेत्री वाणी कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. याच्या प्रदर्शनाची तारीख सांगताना आयुष्मानने आपला एक शर्टलेस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावर त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. आयुष्मानचा चंदीगढ करे आशिकी येत्या ९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली जाणार आहे.