आश्रममुळे बॉबीच्या करिअरला कलाटणी; मिळणार बिग बजेट चित्रपटात संधी
मनोरंजन

आश्रममुळे बॉबीच्या करिअरला कलाटणी; मिळणार बिग बजेट चित्रपटात संधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र, आश्रम नावाच्या वेब सिरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेला मोठी प्रसिद्धी देखील मिळाली होती. काशीपुर वाले बाबा या त्याच्या भूमिकेचे मोठं कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर आता त्याला मोठी लॉटरी लागली असून दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लवकरच बॉबी दिसणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा चित्रपट खूप भव्यदिव्य असणार असून बाहुबलीच्या समान हा नवीन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. यामध्ये बॉबी व्हिलनची भूमिका साकारणार असून आश्रमामधील त्याच्या भूमिकेनंतर त्याचे करिअर वेग पकडू शकते. मागील काही वर्षांपासून बॉबी देओल काम मिळत नसल्याने तो मोठ्या पडद्यावर दिसत नव्हता. कोरोनाच्या या संकटात अनेकजण चित्रपटांचे शूटिंग सुरु नसल्याने वेबसीरिजकडे वळले आहेत. याच दरम्यान बॉबी देओल याने आश्रम सिरीजमध्ये केलेल्या बाबाजी या भूमिकेने त्याला मोठी मदत केली. या सीरिजला देखील मोठी प्रसिद्धी मिळाली.

प्रकाश झा यांच्या आश्रम वेब सीरीज मधील भूमिकेमुळे अनेक मोठे चित्रपट बॅनर्स बॉबीकडे वळले आहेत. त्यामुळे आता या दाक्षिणात्य चित्रपटामधील भूमिकेमुळे त्याची अभिनयाची गाडी रुळावर लागण्याची शक्यता आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला बॉबी देओल याने अनेक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले होते. दरम्यान, या दाक्षिणात्य चित्रपटाबरोबरच बॉबी देओल लव्ह हॉस्टेल या सिनेमात देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सान्या मल्होत्रा आणि विक्रांत मैसी देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमण करणार असून शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.