वाढदिवस विशेष : भिकारी समजून रजनीकांतला दिले होते दहा रुपये
मनोरंजन

वाढदिवस विशेष : भिकारी समजून रजनीकांतला दिले होते दहा रुपये

चेन्नई : साऊथचा देव म्हणून ओळख असणाऱ्या रजनीकांतचा आज वाढदिवस. रजनीकांतचा चित्रपट म्हटले की, चित्रपटगृहाबाहेर भल्या पहाटे तिकिटासाठी रांगा लागतात. शहरात मोठ मोठे होर्डिंग लागतात. या होर्डिंगला दुधाचा अभिषेक घालण्यापासून तर वाजत गाजत मिरवणुका काढण्यापर्यंत सगळे काही चाहते करतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त एक खास किस्सा घडला होता. रजनीकांतला भिकारी समजून एका महिलेने दहा रुपये दिले होते. 2007 साली रजनीकांतचा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाला तो सुपरहिट ठरला. त्यानंतर रजनीकांतची प्रसिद्धी आणखीनच वाढली. खुद्द रजनीकांत यांनी एका मुलाखतीत हा किस्सा ऐकवला होता. शिवाजी सुपरहिट झाल्यानंतर रजनीकांत यांनी देवदर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. पण मंदिरात जायचे तर त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न होता. शेवटी यावर तोडगा काढला गेला. तो म्हणजे, रजनीकांत यांना एका म्हाता-याच्या वेशात मंदिरात पाठवण्याचे ठरले. त्यानुसार, म्हाता-याच्या वेशात रजनीकांत मंदिर परिसरात दाखल झाले. साहजिकच त्या वेशात त्यांना कुणीही ओळखले नाही. रजनीकांत मंदिराच्या पाय-या चढत असताना एक महिलाही त्यांच्यासोबत पाय-या चढत होती. त्या महिलेने रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून 10 रूपयांची नोट भीकेपोटी दिली.

विशेष म्हणजे, रजनीकांत यांनीही ती नोट स्वीकारली. काही क्षणानंतर रजनीकांत मंदिराच्या गाभा-यात पोहोचले आणि त्यांनी स्वत:जवळचे असतील नसतील तितके पैसे दान केले. योगायोगाने त्याक्षणी ती महिलाही त्यांच्या बाजूला होती. ती स्तब्ध झाली. कारण ही म्हातारी व्यक्ती भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत असल्याचे तोपर्यंत तिला कळले होते. रजनीकांत यांना ओळखताच तिने त्यांची माफी मागितली.

दरम्यान, रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये बंगळूरू येथील एका मराठी कुटुंबात झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांची आई गृहिणी होती तर वडील रामोजीराव गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून वडिलांनी रजनीकांत यांचं नाव शिवाजी ठेवलं होतं. ते घरी मराठी आणि बाहेर कन्नड भाषा बोलायचे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये बसकंडक्टर म्हणून कामाला होते.