दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज
मनोरंजन

दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवाचे पोस्टर रिलीज

मुंबई : मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सामान्य माणसाच्या सभोवतालचे विविध संवेदनशील विषय उत्तम पद्धतीने केदार शिंदे यांनी आपल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. आता 3 वर्षांच्या गॅपनंतर केदार शिंदे यांचा नवीन मराठी चित्रपट येत असून वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बाईपण भारी देवा असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अतिशय वेगळ्या अंदाजात या चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मिडियावर प्रदर्शित झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉटस् या संस्थेची पहिली निर्मिती असलेल्या, बाईपण भारी देवा अशा वेगळ्या नावामुळे लक्षवेधून घेणार्‍या या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करणारे आहे. गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असलेल्या या पोस्टरवरून चित्रपटाच्या वेगळेपणाचा अंदाज येतो. तसेच नो टेन्शन, फुल्ल टशन. या कॅचलाईनमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढली आहे.

स्क्रीनशॉटस् या निर्मिती संस्थेचे बाईपण भारी देवा चित्रपटातून मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण होत आहे. परंतु टीव्ही, ओटीटी, ब्रॅंडेड कंटेंट, ऑडिओ आदि माध्यमक्षेत्रात स्क्रीनशॉटस् संस्थेने अल्पावधीत दर्जेदार कलाकृती मधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 2021 यावर्षांमध्ये संस्था अजून काही प्रोजेक्टस घेऊन येणार असल्याचेही निर्मात्या माधुरी भोसले यांनी सांगितले.

आपल्या सभोवताली सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नकारात्मक परिस्थिती विसरायला लावणारे निखळ कौटुंबिक मनोरंजन दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ मधून घडणार आहे. येत्या 28 मे 2021ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.