सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संगीतकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मनोरंजन

सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या संगीतकारांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. आज (ता. १०) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार असून ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट, अनुमती, दिल ए नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी, मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिंदी) अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आणि ते चित्रपट जोरदार गाजले होते. याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय सह अनेक चित्रपटांना त्यांनी पार्श्वसंगीतही दिले होते.

याशिवाय कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण अशा अनेक नाटकांना त्यांनी संगीतबद्ध केले. तर त्याचबरोबर कॉमेडी डॉट कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम अशा मालिकांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्याचबरोबर त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.