महात्मा जोतीराव फुलेंच्या जीवनावर ‘सत्यशोधक’
मनोरंजन

महात्मा जोतीराव फुलेंच्या जीवनावर ‘सत्यशोधक’

मुंबई : महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा मराठी आणि हिंदी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. महात्मा जोतीरावांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. समता फिल्म्स आणि पी बी इन्फ्रा यांच्या संयुक्त बॅनर अंतर्गत चित्रपट तयार होत आहे. गेल्या 3 वर्षा पासून ‘सत्यशोधक’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्व टीम अथक परिश्रम घेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रपटामध्ये जोतीरावांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी, तर राजश्री देशपांडे सावित्री माईची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे 80 टक्के शूटिंग पूर्ण झाले असून, उर्वरीत चित्रीकरण येत्या मे महिन्यात करण्यात येणार आहे. 19व्या शतकाची सुरवात आणि तो काळ पडद्यावर साकारण्यासाठी मोठे भव्य सेट उभारण्यात आले असून, वी.एफ.एक्सच्या आधुनिक तंत्राचा देखील वापर करण्यात आला आहे.

आपल्या कार्य कर्तृत्वाने ‘महात्मा’ पदावर पोहोचलेले जोतीराव आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांची साथ देणाऱ्या सवित्री माईचा संपूर्ण जीवन प्रवास थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे. महात्मा फुले आणि त्यांचे संपूर्ण कार्य चित्रपटाच्या माध्यमातून साकार करणे आव्हानात्मक होते. चित्रपटातील प्रसंग बघताना प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जातील.” असे प्रतिपादन चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर यांनी केले.

जोतिरावांच्या जीवनावर चित्रपट तयार करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे.’ असे समता फिल्म्सचे निर्माते प्रविण तायडे, अप्पा बोराटे यांनी म्हंटले असून, ही कथा हिंदी-मराठी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येईल. असे मत पी बी इन्फ्राचे निर्माते पवन कुमार खोक्कर, भीमराव पट्टेबहादूर यांनी व्यक्त केले आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते बिंदर सिंग, विशाल वाहुरवाघ, प्रतीका बनसोडे यांनी खात्री दिली की, प्रेक्षकांच्या ह्या चित्रपटातून अपेक्षा नक्की पूर्ण होतील, असेही त्यांनी म्हटले.