शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय
क्रीडा

शिष्याकडून गुरुचा पराभव; दिल्लीचा चेन्नईवर सहज विजय

मुंबई : शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार कामगिरीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात दिली. त्यामुळे चेल्याने गुरुला मात दिली असल्याची चर्चा सोशल मीडियावर चालू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करू दिली. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी सलामी दिली. मात्र, दुसऱ्याच षटकात फाफ डु प्लेसिसला आवेश खानने शून्यावर पायचीत पकडले. त्याच्या पुढच्याच षटकात ख्रिस वोक्सने ऋतुराजला वैयक्तिक 5 धावांवर तंबूत धाडले आणि चेन्नईला अडचणीत टाकले. त्यानंतर सुरेश रैना आणि मोईन अली यांनी धावा जमविण्यास सुरुवात केली. मात्र, मोईन अलीने नवव्या षटकात अश्विनला लागोपाठ दोन षटकार ठोकल्यानंतर अश्विनने त्याला तंबुचा मार्ग दाखवला. अलीने 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या अंबाती रायुडू आणि सुरेश रैनाने कमान संभाळत संघाचे शतक पूर्ण केल्यानंतर रैनाने आपले अर्धशतक साकारले. टॉम करनने या रैना-रायुडूची भागीदारी तोडली. त्यानंतर रैनाही धावबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. मग, रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. करनने 15 चेंडूत 34 धावांची खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्यात मदत केली. तर, जडेजा 26 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 2 तर, अश्विन आणि टॉंम करन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

चेन्नईच्या 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या सलामीवीरांनी पाच षटकात संघाच्या 50 धावा फलकावर लावल्या. शॉने 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉनंतर धवननेही आपले अर्धशतक साकारले. या दोघांनी अकराव्या षटकात संघातचे शतक पूर्ण केले. आक्रमक झालेल्या पृथ्वीला ब्राव्हाने बाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वीने 38 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 72 धावा फटकावल्या. धवन शतकाकडे कूच करत असताना शार्दुलने त्याला पायचीत पकडले. धवनने 54 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 85 धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुलला 2 बळी घेता आले असले तरी, त्याच्या 3.4 षटकात 53 धावा कुटल्या गेल्या.