ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

सिनेसृष्टीतून आज पुन्हा दुखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसर, राजीव यांना हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर रणधीर कपूर यांनी राजीव यांना चेंबूरच्या एका रूग्णालयात नेले. मात्र रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू. राजीव कपूर यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”मी माझ्या सर्वात लहान भावाला गमावले आहे. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केलेत पण ते त्याला वाचवू शकले नाहीत,” असं रणधीर कपूर यांनी म्हंटल आहे. खरतरं, कपूर घराण्यातील वर्षभरातील हा दुसरा मृत्यू आहे. गेल्यावर्षी 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून कपूर कुटुंब सावरत असतानाच आज राजीव यांनी जगाचा निरोप घेतला.

राजीव यांनी आपल्या करिअरमध्ये फार चित्रपट केले नाहीत. पण त्यांचा ‘राम तेरी गंगा मैली’आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहेया चित्रपटात राजीव कपूर लीड रोलमध्ये दिसले होते. राजीव यांचे वडिल राज कपूर यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १९९० मध्ये आलेला ‘जिम्मेदार’ हा चित्रपट राजीव कपूर यांचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर राजीव यांनी कुठल्याच चित्रपटात अभिनय केला नाही

अर्थात यापश्चात त्यांनी भाऊ रणधीर कपूर सोबत मिळून ‘हिना’ या चित्रपटाची निर्मिती केली. यात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. अभिनय व निर्मितीशिवाय राजीव कपूर यांनी दिग्दर्शनातही आपला हात आजमावला. ‘प्रेमग्रंथ’ नामक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटातही त्यांचा भाऊ ऋषी कपूर यांनीच मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय माधुरी दीक्षित आणि शम्मी कपूर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.