विद्या बालनचा हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत
मनोरंजन

विद्या बालनचा हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या नटखट या लघुपटाची वर्णी लागली आहे. २०२१ च्या ऑस्करमध्ये नटखटची निवड करण्यात आली आहे. विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला नटखट या लघुपटाला ऑस्कर २०२१ मध्ये शॉर्ट फिल्म कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे, अशी पोस्ट आरएसव्हीपीच्या ट्विटर हॅण्डलवर करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील एका वर्षामध्ये अनेक घडामोडी घडल्या. मात्र, या काळात आमच्या शॉर्ट फिल्मची ऑस्करसाठी निवड करण्यात आली ही खरंच फार छान गोष्ट घडली. ही लघुकथा मला अत्यंत जवळची आहे. लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाली असल्याचे मत विद्या बालनने व्यक्त केले.

नटखट हा लघुपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा लघुपट आहे. समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. ३३ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. दरम्यान, अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नटखटचं स्क्रिनिंग करण्यात आले आहे.