’50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही?’
मनोरंजन

’50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा सुलोचनादीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही?’

नागपूर : शेकडो चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या, 50 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा करणाऱ्या 92 वर्षांच्या सुलोचना लाटकर यांना आजवर दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला नाही, असा उद्विग्न सवाल दिग्दर्शक आणि लेखक उज्ज्वल ठेंगडी यांनी उपस्थित केला आहे. तसेच, दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यासाठी एखाद्याची श्वास थांबण्याची वाट पाहत आहात का, असे अनेक संतप्त सवाल त्यांनी सरकारसह चित्रपट सृष्टीतील दिग्गजांना विचारले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या या मागणीकडे लक्ष घालावे, अशी मागणीही उज्ज्वल ठेंगडी यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना उज्ज्वल ठेंगडी यांनी मोठी खंत व्यक्त केली आहे. ”सुलोचनाताई मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकाला वंदनीय आहेत. मात्र आजवर त्यांच्या योगदानाची दखल का घेतली गेली नाही? दोन वर्षांपूर्वी सुलोचनाजी 90 वर्षांच्या झाल्या असताना सचिन तेंडुलकर, लता दीदी, आशुतोष गोवारीकर आणि खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. तेव्हा वाटले होते की, सरकार सुलोचनाजींच्या अभिनय क्षेत्रातल्या कार्याची दखल घेत आहे. मात्र, पण मूळात 92 व्या वर्षी एखाद्याला दादासाहेब फाळके पुरस्कार देणे गुन्हा आहे. त्यामुळे खंत वाटते की महाराष्ट्रातील कलावंतांकडे मोठा पुरस्कार देताना दुर्लक्ष केलं जाते.

ते पुढे म्हणाले की, जे स्थान लतादीदींचं आहे तेच स्थान चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाच्या मनात सुलोचनाजी यांच्याबद्दलही आहे. महाराष्ट्राच्या या माऊलीचा गौरव करा अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. आज जरी मी एकटा ही मागणी करत असलो तरी उद्या माझ्या मागे लाखो कलावंतांची आवाज असेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर दादासाहेब फाळके कुठचे आहेत? बॉलिवूड कुठे आहे? मग महाराष्ट्रातील कलावंतांकडे दुर्लक्ष का होते असा सवाल उज्ज्वल ठेंगडी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आशुतोष गोवारीकर, सचिन तेंडुलकर यां सर्वानी पंतप्रधानकडे ही मागणी उचलून धरली पाहिजे. जर यंदा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिली ही मागणी मान्य केली गेली नाही तर कदाचित आंदोलन करण्याची वेळ येईल. ती वेळ आणू नका असा इशाराही उज्ज्वल ठेंगडी यांनी दिला आहे.