केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना मोठी भेट
देश बातमी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना मोठी भेट

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज (ता. १४) मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे तीन हफ्ते प्रलंबित आहेत. सरकारने कोरोनामुळे महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हफ्ते प्रलंबित असून, सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात घसघशीत पगार येणार आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै २०२० मध्ये ३ टक्के आणि त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली होती. मात्र कोरोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला. तिजोरीला फटका बसल्यानं केंद्राने केंद्र सरकारने महागाई भत्त्यातील चार टक्के वाढ जुलै २०२१ पर्यंत रोखली होती. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर परिणाम झाला. महागाई भत्त्यात जुलै २०२१ नंतरच वाढ होईल, असंही सरकारने त्यावेळी म्हटलं होतं.

केंद्रीय कर्मचारी युनियनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए देणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पगारात महागाई भत्ता (डीए) आणि डीआर दिला जाईल. सरकार केंद्रीय हफ्ते आणि निवृत्तीवेतनधारकांना तीन हफ्त्यांचे डीए आणि डीआर देईल. हे तीन हफ्ते जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ मधील असतील. तर जुलै आणि ऑगस्ट २०२१ साठी थकबाकीही देण्यात येणार असून, सप्टेंबरमध्ये ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली जाईल, अशी माहिती मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती.