रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी भारतात परवानगी
बातमी विदेश

रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी भारतात परवानगी

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अशात एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात तिसऱ्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. रशियाच्या गामालय सेंटरने ही लस विकसित केली आहे. रशियाच्या स्पुटनिक लसीच्या प्रतिबंधित वापरासाठी परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे.

स्पुटनिक लसीचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासंबंधीची माहिती तपासल्यानंतर ही परवानगी देण्यात आली आहे. कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यात रशियाची स्पुटनिक लस ९२ टक्के परिणामकारक ठरली असल्याचा तेथील आरोग्य मंत्रालयाने अंतरिम निष्कर्षात म्हटलं आहे. सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध होणार आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.