सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई
क्रीडा

सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई

मुंबई : भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला मात्र भारतीय संघाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. षटकांची गती संथ राखल्याबद्दल भारतीय संघाला दंड बसला आहे. भारतीय खेळाडूंना सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने काल (ता. १२) सोमवारी ही माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हा सामना जिंकून भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मात्र, भारतीय महिला संघ निर्धारित वेळापेक्षा मागे होता. या कारणास्तव सामना रेफरी फिल विटिक्सने संघाला शिक्षा सुनावली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे या कारणास्तव औपचारिक सुनावणीची आवश्यकता नाही. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, षटकांची गती कमी राखल्याबद्दल खेळाडूंना त्यांच्या प्रत्येक सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के दंड आकारला जातो.

अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला ९ धावांनी पराभूत केले. भारताने इंग्लंडसमोर प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ १४० धावा करू शकला. या सामन्यात भारताला इंग्लंडचे तीन फलंदाज धावचीत करण्यात यश आले. नॅट स्किवर, हिथर नाइट आणि सोफिया डंकले धावचीत होऊन तंबूत परतले. इंग्लंडकडून टॅम्सिन आणि हिथर या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. मात्र दीप्ती शर्माने टॅम्सिनला पायचीत करत तंबूचा रस्ता दाखवला आणि विजय सोपा झाला. भारतासाठी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली खेळी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी ७० धावांची भागीदारी केली.