म्यानमारच्या राजकारणात सत्तापालट; लष्कराने हाती घेतली सत्ता
बातमी विदेश

म्यानमारच्या राजकारणात सत्तापालट; लष्कराने हाती घेतली सत्ता

म्यानमारमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. म्यानमारच्या लष्कराने सत्ता हाती घेत लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान सरकार आणि देशाच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला होता. एका छाप्यादरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) या पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

म्यानमारच्या लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत. एनएलडीचे प्रवक्ते म्हणाले, “आंग सान सू की, राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांना आज सकाळी कुठेतरी नेण्यात आले. मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की, या वेळीही कायद्याचे पालन करा. मला स्वतःला अटक होण्याची शक्यता वाटते.” अटक सत्रावर म्यानमारच्या लष्कराने अद्याप काहीही म्हटलेलं नाही.

दरम्यान, लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर रंगून शहरात सीटी हॉलच्या बाहेर लष्करी सैनिकांना तैनात करण्यात आलं आहे. सरकारी एमआरटीव्हीने फेसबुकवरुन सांगितलं की, तांत्रिक कारणांमुळे ते थेट प्रसारण करु शकत नाहीत. तर एनएलडीच्या एका नेत्यानं सांगितलं की, पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या एका सदस्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

म्यानमारच्या संविधानानुसार त्यांच्या संसदेत लष्करासाठी २५ टक्के जागा आरक्षित असतात. तसेच सरकारच्या तीन महत्वाच्या विभागांवरही सैन्याचचं नियंत्रण असतं. तर, म्यानमारच्या सैन्यानं शनिवारी म्हटलं होतं की, ते देशाच्या संविधानानुसारच काम करतील. यापूर्वी देखील सैन्याकडून सत्तापालट घडवून आणण्याची शंका उपस्थित केली जात होती. सैन्याने निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर देशाच्या निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलं होतं की कोणताही घोटाळा झालेला नाही अत्यंत विश्वसनीय पद्धतीने निवडणुका पार पडलेल्या आहेत.