निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार
देश बातमी

निर्मला सीतारमण असा सादर करणार अर्थसंकल्प; पारंपारिक पद्धत मोडीत निघणार

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशातच गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा मोठा फटकाही अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोना संकटातून सावरताना विकासाचं ध्येय गाठण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. आरोग्य, पायाभूत सुविधा आणि शेजारी देशांमुळे निर्माण झालेल्या सीमासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी भरीव तरतूदही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली असावी, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, आज सकाळी अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं. तर अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीदेखील कोरोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असेल आणि या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल, असं सांगितलं आहे.

अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात आणि या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो. यंदामात्र छापील अर्थसंकल्पाऐवजी अर्थसंकल्प डिजिटल माध्यमातून सादर केला जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर करणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. आर्थिक दृढीकरण आणि १५व्या वित्त आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यावरही भर असेल.